मान्सून वेशीवर; दोन-तीन दिवसात मध्य महाराष्ट्रात


वेब टीम

पुणे - आज येईल उद्या येईल अशी आशा धरून बळीराजा आभाळाकडे नजर लावून बसला आहे. राज्यातील नागरिकांकरिता हवामान खात्याने आनंदवार्ता दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) राज्याच्या वेशीवर पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत तळकोकण, दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत तो दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. येत्या चार दिवसांत मध्य महाराष्ट्रातही त्याचे आगमन होईल, असे नमूद केले आहे.

‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे राज्यातील आगमन लांबणीवर पडले आहे. जून महिना संपत आला तरीदेखील राज्यात दमदार पाऊस पडत नसल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर मान्सूनच्या आगमनाची वार्ता सुखावणारी ठरणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मोसमी वारे मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, बहुतांश कर्नाटक, गोवा, कोकणचा काही भाग, तेलंगणा, तामिळनाडूचा उर्वरित भाग, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, ईशान्य भारताचा उर्वरित भाग, पश्‍चिम बंगालचा आणखी काही भाग, बिहार, झारखंड व ओडिशाच्या बहुतांश भागात पोहोचतील, असा अंदाजही वर्तविला गेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post