थोरातांची विखेंवर खोचक टीका ; तुम्ही काँग्रेसची काळजी करू नका


वेब टीम : शिर्डी
काँग्रेसच्या पराभवानंतर आता मंथन शिबीराला शिर्डीत सुरूवात झाली आहे. युवक काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिरात राज्यातील युवक काँग्रेसचे सगळे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. ज्यांना सत्तेची चटक लागलीय, ज्यांना संघर्ष नकोय, असे लोक पक्ष सोडून जात असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी आणी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी युवक काँग्रेस सज्ज झाली आहे.

शिर्डी जवळच्या राहाता शहरात युवक काँग्रेसच्या दोन दिवसीय युवक मंथन शिबीराला आजपासून प्रारंभ झाला. यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र यादव यांच्यासह बाळासाहेब थोरात आणि मधुकर भावे यांची उपस्थिती होती. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी याठिकाणी उपस्थित आहेत. दोन दिवसांत पक्षातील अनेक बडे नेतेही येथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

लोकसभेच्या निकालानंतर आपण सर्व निराश आहोत. अशा वेळी बरेच जण पक्ष सोडून जाता आहेत. मोठे मोठे जातीलही ज्यांना सत्तेची चटक लागली ते जातील. ज्यांना संघर्ष नकोय असे जातील, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी विखे यांचे नाव न घेता केली. युवकांना हीच वेळ आहे आता रिकाम्या जागा धरण्याची तर युवकांनी आता पुढे येऊन पक्षाला उभारी देण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी युवकांना केले.

 थोरातांची विखेंवर टीका
आज राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस असून त्यांच्याच मतदार संघात युवक काँग्रेसच्या शिबीरात उपस्थित असलेल्या बाळासाहेब थोरातांनी विखेंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एकमेकांचे राजकिय विरोधक असलेल्या विखे थोरातांमध्ये सध्या वाकयुद्ध सुरू आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोघे सोडत नाही. थोरातांनी शुभेच्छा दिल्या खऱ्या मात्र विखेंवर त्यांनी खोचक टीकाही केली आहे. तुम्ही आता काँग्रेस पक्षाची काळजी करू नका, तुमची भूमिका बदलली आहे, अशी टीका करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post