'मी नवऱ्याचा खून केला, मला अटक करा'!


DNALive24 : यवतमाळ
सकाळी १० ची वेळ. ठिकाण यवतमाळचे शहर पोलीस ठाणे. कर्मचारी दैनंदिन कामात. इतक्यात एक महिला पोलीस स्टेशनला येते. 'मी माझ्या नवऱ्याचा खून केला, मला अटक करा' म्हणते. ठाण्यातील कर्मचारी सिनेस्टाइल झालेल्या प्रकाराने थक्क होतात. गुन्हा दाखल करण्याची तयारीही सुरु होते. चौकशीअंती त्या बाईचा नवरा जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस सुटकेचा निश्वास टाकतात.

या प्रकारामुळे केवळ तास दोन तासासाठी नव्हे तर दुपारपर्यंत पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती. शहरातील वंजारी फैलमधील एका व्यक्तीला त्याच्या पत्नीने सकाळी मारहाण केली. या मारहाणीत तो किरकोळ जखमी झाला. दरम्यान त्याच्या पत्नीने थेट यवतमाळ शहर पोलीस स्टेशन गाठून साहेब मला अटक करा, मी नवऱ्याचा खून केल्याचे सांगितले.

महिलेच्या या वक्तव्याने पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आणि अधिकारी, कर्मचारी वंजारी फैलात पोहोचले. मात्र, त्या महिलेचा नवरा घरी नव्हता, त्या वेळी परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात गेल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी जिल्हा रुग्णालय गाठून तपासणी केली, तर काय त्याच नावाची एक गंभीर जखमी असलेली व्यक्ती आयसीयत उपचार घेत होती.

त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंद करण्याची तयारी सुरू केली. मात्र, त्यापूर्वी त्या जखमी व्यक्तीची माहिती घेतली असता तो धामणगावजवळ घडलेल्या अपघातातील जखमी असल्याचे कळाले. त्यामुळे परत पोलिसांनी वंजारी फैलातील त्या महिलेचे घर गाठले. तर त्या महिलेचा नवरा जेवण करताना आढळल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. असे काहीच घडले नसून किरकोळ वाद झाल्याचे त्याने सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post