विखेंसाठी जाणार प्रकाश मेहतांचा बळी


वेब टीम, मुंबई
 एकाचा फायदा, हा दुसऱ्याचा तोटा असतो, याचा प्रत्यय देणारी घटना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडण्याची चिन्हे आहेत. एमपी मिल एसआरए घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांवर ओढलेले ताशेरे, राज्यमंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी आणि मंत्रिमंडळातल्या एन्ट्रीसाठी तयार असलेले राधाकृष्ण विखे पाटील... हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर, राधाकृष्ण विखेंना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, म्हणून प्रकाश मेहतांच्या खुर्चीवर टांगती तलवार आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहे.

मुंबईतल्या एसआरए प्रकल्पांना मान्यता देताना प्रकाश मेहतांचा कारभार पारदर्शी नसल्याचा ठपका लोकायुक्तांनी ठेवला. मेहतांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी उचलून धरली. तर मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करुन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाध्यक्ष अमित शाहांना भेटणार आहेत. त्यामुळे विखे पाटील हे प्रकाश मेहतांच्या डोक्यावर पाय ठेवून मंत्रिमंडळात एन्ट्री करणार का, हे पाहने उत्सुकतेचे ठरणार आहे.

काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील 11 किंवा 12 जूनला भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांची दिल्लीत भेट होत आहे. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने कुणाचा सहभाग करायचा, तसेच रावसाहेब दानवेंच्या खासदारकीनंतर राज्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. रावसाहेब दानवे आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनीही दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मुख्यमंत्री याबाबत चर्चा करुन संभाव्य नावांवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईत आणि नंतर दिल्लीतही यासंदर्भातल्या बैठका होणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates