राष्ट्रवादीचे १० आमदार वंचित आघाडीच्या संपर्कात : प्रकाश आंबेडकरांचा दावा


DNALive24 : अकोला
राज्यात सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले असताना भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीला दणका दिला. राष्ट्रवादीचे १० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे. यासोबतच, पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत उतरून मोठ-मोठ्या राजकीय पक्षांना हादरवणार्‍या वंचित बहुजन आघाडीला मुस्लिम मते मिळाली नाहीत. औरंगाबाद वगळता वंचित आघाडीला मुस्लिमांचे समर्थन मिळाले नाही अशी खंत देखील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किमान १० आमदार वंचित आघाडीच्या संपर्खात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आमदार वंचित आघाडीत प्रवेश करू शकतात असे अप्रत्यक्षरित्या आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीने राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न केवळ औरंगाबादेतच यशस्वी ठरला. या ठिकाणी गेल्या ४ टर्मपासून खासदार राहिलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे पराभूत झाले. त्यांच्या जागी एमआयएम आणि वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विजय झाला.

कॉंग्रेसला पर्याय म्हणून मुस्लिमांचा वंचितकडे कल...
मुस्लिमांनी कॉंग्रेसला पर्याय म्हणून वंचित आघाडीकडे पाहण्यास सुरुवात केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत वंचितला त्याचा मोठा फायदा होऊ शकेल असेही ते पुढे म्हणाले. सोबतच, राष्ट्रवादीचे किती आमदार आणि इतर कोण-कोण संपर्कात आहेत याची सविस्तर माहिती आपण ७ जूनला देऊ असे आंबेडकर म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने महाराष्ट्रातून सर्व ४८ जागांवर उमेदवार उतरवले होते. विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यातील सर्वच २८८ जागा लढवणार असा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates