निवडणूक आली म्हणून यात्रा काढायची गरज नाही, प्रकाश आंबेडकरांंचा मुख्यमंत्र्यांना टोला


वेब टीम : नागपूर
निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आम्हाला कोणतीही यात्रा काढण्याची गरज नाही. यापूर्वीच आम्ही लोकसभेत मशागत केली आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता रवी भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रा काढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता ते बोलत होते. यात्रेशिवाय आम्ही निवडणुका जिंकू शकतो, असे ते म्हणाले.


आयडियालॉजीचे राजकारण कमी झाले आहे. अनेक दिवस एका पक्षात राहून आपल्याला स्थान मिळत नाही हे पाहून अनेक जण बाहेर पडत आहेत. हे फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच नव्हे, तर भाजप शिवसेनेमध्ये हेच होत असल्याचे सांगत आंबेडकर यांनी पक्षबदल करणार्‍यांवर टीका केली.
तिसर्‍या आघाडीसंदर्भात आम्ही ठाम आहोत. मात्र, उरलेले लोक ठाम नाहीत, असे म्हणावे लागेल. अनेक जण वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे कोण आमच्यासोबत येईल आणि कोण येणार नाही हे आताच सांगता येणार नाही. सीपीएममधला एक गट आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी आमच्यासोबत आहे. इतरांसोबत चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले. येत्या 10 ऑगस्टपर्यंत आघाडीचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे. न झाल्यास 15 ऑगस्टनंतर आमचे उमेदवार जाहीर करणे सुरू करू. त्याच वेळी आमचे धोरणही जाहीर करू, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post