मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव


वेब टीम : अहमदनगर
उन्नत शेती, समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाच्या वतीने शिंगवे नाईक येथे मका पिकाच्या शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दत्तराज जाधव यांच्या शेतातील मका पिकाची पाहणी उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे व तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी केली.

यावेळी तंत्र अधिकारी रवींद्र माळी, मंडल कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, नारायण करांडे, कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी, संजय मेहेत्रे, गोसावी, मेचकर, श्रीमती वाणी, सोनवणे, सुमीतोमो कंपनीचे प्रतिनिधी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात आढळून आला. या अळीचे नियंत्रण करण्यासाठी सुमीतोमो या कंपनीतर्फे जैविक औषधी फवारणीचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना करून दाखविण्यात आले. या प्रात्यक्षिकामुळे या अळीचे नियंत्रण आटोक्यात आल्याचे दिसून आले. किटकनाशक फवारताना किडीचा प्रादुर्भाव हा नुकसानीची पातळी पाहून त्यावर फवारणी करावी, असे उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांनी आता गटशेतीने शेती करावी. यापुढील काळात गटशेतीशिवाय पर्याय नाही. एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण गटशेतीच्या माध्यमातून होईल. त्याचा शेतकर्‍याच्या उत्पन्न वाढीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. शेतकर्‍यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार शेती करावी. शेतीमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. ते शेतकर्‍यांनी आता आत्मसात करायला हवे. परंपरागत शेती व्यवसाय न करता आधुनिक तंत्रज्ञानानुसार शेतीचा अवलंब करून आपले जीवन बदलावे, असे श्री. कापसे यांनी सांगितले.
    तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे म्हणाले की, उन्नत शेती, समृद्ध शेती योजनेंतर्गत तालुक्यात विविध पिकांवर शेती शाळांचे आयोजन करण्यात आले असून, या शेती शाळेमध्ये लागवडीपासून विक्रीपर्यंतचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना सांगण्यात येणार आहे. याचा जास्तीत जास्त फायदा शेतकर्‍यांनी करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates