अभिनेत्री दिपाली सय्यद नगर-श्रीगोंद्याच्या मैदानात


वेब टीम : अहमदनगर
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांसाठी ठरणार्‍या 'साकळाई’ उपसा जल सिंचन योजनेसाठी सामाजिक कार्यकर्त्या आणि संवेदनशिल अभिनेत्री दिपाली सय्यद - भोसले यांनी जनआंदोलनाचे हत्यार उपसले असून क्रांतीदिनी (दि.९ ऑगस्ट) जिल्हापरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु करण्याचे जाहीर केले आहे. या उपोषणाला मोठ्या जनआंदोलनाचे स्वरूप येवून राज्य सरकारवर दबाव येण्यासाठी त्यांनी शनिवार (दि.२०) पासून गावोगावी जनजागृती दौरा सुरु सुरु केला आहे.

ज्या देवीच्या नावाने ही योजना प्रस्तावित केलेली आहे, त्या चिखली - कोरेगावच्या परिसरात असणाऱ्या डोंगरावरील साकळाई देवीच्या मंदिरात नारळ वाढवून त्यांनी आपल्या जनजागृती दौऱ्यास प्रारंभ केला. यावेळी 'साकळाई’ उपसा जल सिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब नलगे, सतीश ढवळे, बाळासाहेब लंभाटे, नारायण रोडे,शब्बीर शेख, विजय वाघमारे, तुकाराम काळे, रोहिदास उदमले, दीपक बेरड, रमेश काटे, सचिन टकले, कृषिराज टकले, प्रवीण शिंदे,सतीश वाबळे, सुभाष नागरे आदींसह कृती समितीचे सदस्य, विविध गावांमधील नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभिनेत्री दिपाली सय्यद - भोसले म्हणाल्या, 'साकळाई’ योजनेवर फक्त राजकारण सुरू आहे. निवडणुकीपुरती यावर चर्चा होते व त्यानंतर पुढे काहीच होत नाही. श्रीगोंद्यातील काही भाग जसा हरित आहे, तसा साकळाई गावासह रुईछत्तीशी,वाळकी, गुंडेगाव परिसरातील भागही साकळाई योजनेने हरित होऊ शकतो, पण यासाठी आता पाणी नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सांगतात व दुसरीकडे मुख्यमंत्री वाळकीच्या सभेत महिनाभरात या योजनेचे काम मार्गी लावण्याची ग्वाही देतात,अशी परस्परविरोधी वक्तव्ये चुकीची आहेत. शिवाय खासदार डॉ. सुजय विखेही यावर आता काही बोलत नाहीत’, अशी टीका करून सय्यद म्हणाल्या, साकळाई योजना होत नसेल तर तिला दुसरा पर्याय काय, यावर कोणी बोलत नाही. मात्र, आपण साकळाईला पर्यायी योजना तयार केली आहे, तिचा आराखडाही तयार केला आहे. प्रस्तावित उपोषण आंदोलनाआधी मुख्यमंत्र्यांना भेटून तो त्यांना देणार आहे व 9 ऑगस्टला उपोषणस्थळी तो जाहीर करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

'साकळाई’ योजनेबाबत नुसत्या घोषणा ऐकून एक पिढी संपली आहे, मात्र आता राजकारण अजिबात होवू देणार नाही, पुढच्या पिढीला तरी हक्काचे पाणी मिळावे म्हणून हा लढा असून यामध्ये लाभार्थी गावातील शेतकरी, ग्रामस्थ, युवक वर्ग, महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पहिल्याच दिवशी त्यांनी चिखली, कोरेगाव, हिवरे झरे या गावांना भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधत या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

'साकळाई’ उपसा जल सिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी साकळाई’ योजनेचे कसे राजकारण केले हे सांगत आता या पुढाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आमच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post