राष्ट्रवादीला मोठा धक्का: आ. वैभवराव पिचड शिवसेनेच्या वाटेवर?


वेब टीम : मुंबई
अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांच्या बंडखोरीची चर्चा चांगलीच रंगली आहे. ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असून, जर जागेची “खांदेपालट” झाली तर “भाजप” नाहीतर “शिवसेना” असा नाट्यमय प्रकार मुंबईत सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. त्यामुळे जवळ-जवळ पिचडांनी “शिवसेनेवर मोहर” लावल्याचे बोलले जात आहे. वैभव हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे पुत्र असल्याने त्यांचा शिवसेना प्रवेश झाल्यास हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे.

“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” असेच काही विखे पाटील यांनी लोकसभेत करून दाखविले. आता जिल्ह्यात एकही आमदार अन्य पक्षांचा निवडून येऊ देणार नाही, अशी शपथ त्यांनी  घेतली होती. त्यामुळे ते कामाला लागले असून, अकोल्यातून “वैभव पिचड” यांना त्यांनी पहिल्या अजेंड्यावर घेतले. अकोल्यात गेली ३५ वर्षे शिवसेना राष्ट्रवादीला टक्कर देत आहे. अशोक भांगरे आणि मधुकर तळपाडे हे परंपरागत योद्धे असून दोघांची ताकद एक न झाल्यामुळे आजवर पिचड साहेबांचे फावले आहे. त्यामुळे उद्या युती झाली तर ही जागा शिवसेना जिंकू शकते. असे असताना ठाकरे साहेब या जागा भाजपला का देतील ? हा सर्वसाधारण प्रश्न आहे.

आपल्या सगळ्यांना कालची लोकसभा आठवत असेल. डॉ. सुजय विखे यांना राष्ट्रवादीने जागा सोडली नाही. पण, राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांनी लढावं असे पक्षाला वाटत होते. हे दादांनी भाषणात सांगितले आहे. म्हणजे हवं तर आमच्याकडून लढा पण जागांची अदला-बदल करू नका.  हे त्यांनी स्पष्ट सांगितले. अगदी तीच गंमत अकोल्यात झाली आहे. पिचड साहेब आमच्याकडून लढा. पण, शिवसेनेची जागा भाजपच्या नावाखाली मागवू नका. हिच भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

मंगळवार दि. २३ रोजी दुपारी अकोल्याचे एक शिष्ठमंडळ विखे पाटलांना भेटले. पाहुणचार झाल्यानंतर ते स्वत: ठाकरे साहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेल्याचे समजते. आता काय चर्चा झाली याचे विश्लेषण मिळाले नाही. मात्र, शिवसेनेने ही जागा भाजपसाठी सोडावी. ती निवडून आणण्याची जबाबदारी विखे पाटील घेणार असल्याचे बोलले जात आहे. आणि जर तसे नाही झाले तर “अकोल्याचे वैभव” हातातून “घड्याळ” काढून शिवधनुष्य पेलणार असल्याची माहिती हाती आली आहे. काही झाले तरी एक नक्की आहे. जर वैभव पिचड यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली तर “आजवर अकोल्याच्या इतिहासात कधी नव्हे इतक्या फरकाने ते निवडून येतील”. मात्र, कालपर्यंत घड्याळाशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते भगव्या झेंड्याखाली रमतील का ? रमले तरी खरे शिवसैनिक आणि अॅन्टी शिवसैनिक यांच्यात ताळमेळ बसेल का? अर्थात पिचड यांनी पक्षपरत्वे नाही तर व्यक्तीपरत्वे राजकारण केले आहे. त्यामुळे जनता व त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांना डावलणार नाही.  अशा परिस्थितीत “कानामागून आली आणि तिखट झाली”, अशी तू-तू, मै-मै शिवसैनिकांमध्ये कायम चालणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post