फक्त 'त्याच' आमदारांना देणार भाजपचे तिकीट : मुख्यमंत्री


वेब टीम : मुंबई
लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले म्हणून समाधान मानू नका. ते मताधिक्य तुम्हाला नाही, मोदींना दिले आहे. पाच वर्षातील कामाचे मूल्यमापन करूनच विद्यमान आमदारांना तिकीट दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शनिवारी पक्षाच्या प्रदेश पदाधिकार्‍यांची बैठक वसंत स्मृती येथे झाली. यावेळी फडणवीस यांनी आमदारांना निवडणुकीतील उमेदवारीचा निकष काय असेल याची स्पष्ट कल्पना दिली.

लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मिळाली आहेत. तेव्हा लोकसभेच्या वेळी आपल्या विधानसभा मतदारसंघातील मते ही तुमची आहेत असे समजू नका. मताधिक्य दिले म्हणून उमेदवारी मिळेल या भ्रमात राहू नका, असे फडणवीस यांनी बजावले.

आगामी निवडणुका  आपल्याला जिंकायच्याच आहेत, तशी तयारी  करा. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी येथे केले. आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या  तयारीला लागा, असा आदेश त्यांनी दिला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासोबतच पक्षाच्या सदस्यता मोहिमेला यशस्वी करा, असे नड्डा म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post