नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा भाजप-शिवसेना सरकार येणार : मुख्यमंत्र्यांचा दावा


वेब टीम : मुंबई
मी पुन्हा येईन, याच भूमिकेत, याच ठिकाणी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, अशा शब्दात पुन्हा भाजप-शिवसेनेचेच सरकार येणार आणि आपणच मुख्यमंत्री होणार असा आत्मविश्वास मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत व्यक्त केला. विरोधी पक्षांनी मात्र जनतेला कुणीही गृहित धरु नये, कोण कुठे येणार ? कोण कुठे बसणार हे जनता ठरवणार आहे, असे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील हे विधिमंडळाचे शेवटचे अधिवेशन. त्यानंतर  विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे या शेवटच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी समारोपाच्या भाषणात गेल्या पाच वर्षांतील आपल्या सरकारच्या कामाचा धावता आढावा घेतला.

पक्षाने व महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न केला, असे फडणवीस म्हणाले. गेल्या पाच वर्षांत अनेक अडचणी आल्या, परंतु मी पळ काढला नाही, सकारात्मकतेने प्रत्येक अडचणीला तोंड देण्याचा, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. जे जे समोर आले, त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. असंख्य कामे केली, काही राहिली. समस्या खूप आहेत, अजून भरपूर पल्ला गाठायचा आहे. परंतु महाराष्ट्राला सर्व आघाडय़ांवर क्रमांक एकवर ठेवण्याचा आपण प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आपणच मुख्यमंत्री होणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढील अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर द्यायलाही मीच असेन असे ते म्हणाले. मी पुन्हा येईन, याच भूमिकेत, याच निर्धाराने, याच ठिकाणी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी या कवितेतून त्यांनी हा आत्मविश्वास बोलून दाखविला. खरे म्हणजे शिवसेनेचाही मुख्यमंत्रीपदावर दावा आहे, तरीही फडणवीस यांनी पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार असे संकेत दिल्याने शिवसेनेची पंचाईत झाली. तरीही शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई व आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा युतीचीच सत्ता येणार आणि आपणच मुख्यमंत्री होणार, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला, तरी विरोधी पक्ष नेते जयंत पाटील व विजय वडेट्टीवार यांनी जनतेला कुणीही गृहित धरु नये, याची आठवण करुन दिली. कोण सत्तेत बसणार व कोण विरोधात बसणार हे जनता ठरवणार आहे, याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांनी या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपाध्यक्ष विजय औटी, संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांचेही अभिनंदन करण्यात केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post