डिजिटल पोमोग्रेनेट हाऊसला हजारांहून अधिक शेतकर्यांची भेट


वेब टीम : अहमदनगर
अ.नगर कृषी कार्यालय येथे शेतकर्यांच्या माहितीसाठी हवामान फळ, पीक विमा योजनेवर आधारित पोमोग्रेनेट हाऊस उभारण्यात आले होते. या हाऊसला आतापर्यंत हजारांहून अधिक शेतकर्यांनी भेट देऊन माहिती घेतली. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे यांनी या हाऊसला भेट देऊन पाहणी केली.


यावेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, तंत्र अधिकारी रवींद्र माळी, मंडळ कृषी अधिकारी नारायण करांडे, संजय मेहेत्रे, बाळासाहेब आठरे, विनोद वाडेकर आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. नलगे म्हणाले की, डाळिंबाच्या आकाराचे पोमोग्रेनेट हाऊस उभारण्यात आले आहे. वेगळी संकल्पना यावेळी राबविण्यात आली आहे. या हाऊसमुळे शेतकर्यांना फळ, पीक विमा योजनेबाबत अद्ययावत माहिती उपलब्ध झाली आहे. शेतकर्यांनी फळ, पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी डिजिटल पोमोग्रेनेट हाऊस उभारण्यात आले होते. शेतकर्यांनी पीक विमा उतरवावा, यासाठी शासन स्तरावर विविध पद्धतीने प्रयत्न केले जात असून, यासाठी सोशल मीडियाचा सुद्धा वापर करण्यात आला आहे. लहरी वातावरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कधी आर्थिक संकट ओढवेल हे कोणीही सांगू शकत नाही. शाश्वत उत्पन्न शेतकर्यांच्या हातात राहिले नसून, पीक विमा उतरवल्यास त्यांच्या अडचणी काही अंशी दूर होण्यास मदत होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना पीक विम्यामुळे आर्थिक मदत होऊ शकेल, असे ते म्हणाले.

तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे म्हणाले की, हवामानावर आधारित फळ, पीक विमा योजनेत संत्रा, मोसंबी, पेरू, चिक्कू, डाळिंब, लिंबू या पिकांचा या योजनेत समावेश आहे. नगरबरोबरच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासाठी ही योजना लागू आहे. अंतिम मुदतीआधी विमा सादर करण्यासाठी नजीकची आपली बँक शाखा, सहकारी सोसायटी किंवा जनसुविधा (सीएससी) केंद्राशी संपर्क साधावा, जनसुविधा केंद्रामार्फत पीकविमा भरताना विमा हप्त्याशिवाय कोणतीही आगाऊ रक्कम भरण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post