Wimbledon 2019 : हॅलेपचा ऐतिहासिक विजय; सेरेनाला पराभवाचा धक्का


वेब टीम : क्रीडा
विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अमेरिकेची सेरेना विल्यम्स हिला अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला. सातवी मानांकित रोमानियाची सिमोना हॅलेप हिने सेरेनला दोन सरळ सेटमध्ये पराभूत करून पहिल्या वहिल्या विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घातली.
सात वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाला २४ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याची संधी होती. पण हॅलेपने अप्रतिम खेळ केला. तिने सेरेनवर ६-२, ६-२ असा एकतर्फी विजय मिळवला.

‘आईचं स्वप्न पूर्ण केलं’
या विजेतेपदानंतर हॅलेपने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली की माझ्या आईने माझ्यासाठी हे स्वप्न पाहिले होते. तिने मला सांगितले होते की जर तुला टेनिसमध्ये काही विशेष करून दाखवायचे असेल, तर विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळ. आज मी या प्रतिक्षेच्या स्पर्धेत अंतिम सामना खेळले आणि महत्वाचे म्हणजे मी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे मी माझ्या आईने माझ्यासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण केल्याचा मला अभिमान आहे, असे ती म्हणाली.

या आधी सेरेनाने गुरुवारी बाबरेरा स्ट्रायकोव्हाला सहज धूळ चारत ११ व्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. तर हॅलेपने एलिना स्वितोलिनाचे आव्हान सहजपणे परतवून लावत अंतिम फेरीत खेळण्याचा मान पटकावला होता. सेरेना आणि हॅलेप यांच्यात या आधी १० लढती झाल्या होत्या. त्यातील ९ वेळा सेरेनाने विजय मिळवला होता. याशिवाय, हॅलेपने चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती आणि गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपदही पटकावले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post