मुख्यमंत्री साहेब, नगरच्या ३०० कोटींच काय झालं?: भाजप नगरसेविकेचा सवाल


वेब टीम : अहमदनगर
महापालिका निवडणूक होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र घोषणा केल्याप्रमाणे 300 कोटीपैकी एक रुपयाही महापालिकेला मिळाला नाही. या निधीची मागणी करत भाजपाच्या नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सोनाबाई तायगा शिंदे यांनी पक्षाला निवडणुकीत केलेल्या घोषणेची आठवण करून देत स्मरणपत्र पाठविले आहे.

महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाने सत्ता स्थापन केली आहे़ महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचा महापौर झाल्यास शहराच्या विकासासाठी 300 कोटी रुपये देऊ, अशी घोषणा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली होती़ तसेच महापालिका निवडणूक काळात मुख्यमंत्र्यांचीही सभा शहरातील गांधी मैदान येथे झाली होती. त्यांनीही शहरासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केली होती़ मात्र गेल्या आठ महिन्यांच्या काळात एक रुपयाचाही निधी पालिकेला मिळाला नाही़ या पार्श्वभूमीवर महापालिकेतील भाजपाच्या नगरसेविका सोनाबाई तायगा शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने पत्र पाठविले आहे़.

यापूर्वी त्यांनी 15 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र दिले होते़ मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही़ त्यामुळे शिंदे यांनी आता थेट पंतप्रधानानांच पत्र लिहिले आहे़ महापालिका निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली होती़ त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेतून निधीची घोषणा करावी, अन्यथा पक्षावर नगरकर विश्वास ठेवणार नाहीत, असे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिलेला शब्द पाळला नाही़ त्यामुळे शहरासह नगरसेवकांवर टीका होऊ लागली असून, पक्षाच्या विश्वासार्हतेवर भाजपाच्या नगरसेविकेने शंका उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post