पुण्यात न्यायालयात घाण कराल तर खबरदार; पोलीस, शिपायांसह वकिलांची टीम


वेब टीम : पुणे
जिल्ह्यातील न्यायालयात अस्वच्छता करणे आता महागात पडणार आहे. अस्वच्छता करणाऱ्यास तीन महिने कारावास अथवा दोन हजार रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. त्यामुळे पान, गुटखा, तंबाखू खाऊन न्यायालयाच्या भिंती रंगविणाऱ्यांना आता चाप बसणार आहे.


न्यायालय आवारात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करता यावी, यासाठी न्यायालयातील पोलीस आणि शिपाई यांच्यासोबतच 10 वकिलांची टिम तयार करण्यात आली आहे. यामध्ये ऍड. विकास शिंदे, ऍड. प्रतीक जगताप, ऍड. उत्तम ढवळे, ऍड. सोमनाथ भिसे, ऍड. किशोर जायभाय, ऍड. अनिल जाधव, ऍड. प्रताप मोरे, ऍड. विजय कुंभार, ऍड. सुजाता कुलकर्णी आणि ऍड. दीप्ती राजपूत यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी शुक्रवारी याबाबत परिपत्रक काढले आहे. न्यायालय आवारात धूम्रपान करून, पान, गुटखा, तंबाखू, खाऊन अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. परिपत्रक पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांसाठी काढण्यात आले आहे.

न्यायालयाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावा यासाठी येथील काही तरुण वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांना निवेदन देवून गुटखा, तंबाखू, मावा, पान खाऊन न्यायालयातील इमारती आणि परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post