शेतकऱ्यांनी लष्करी अळीचे नियंत्रण सामूहिक पद्धतीने करावे : विलास नलगे


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यात खरीप हंगाम सन 2019 20 मध्ये मका या पिकाची पेरणी एकूण 89094 हेक्‍टर क्षेत्रावर झालेली आहे. मका पिकावर चालू वर्षी नवीन अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला आहे. या अळीचे नियंत्रण वेळेत न झाल्यास ज्वारी ऊस भात भाजीपाला व इतर पिकावरही या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे या अळीचे नियंत्रण सामूहिक पद्धतीने शेतकऱ्यांनी करावे असे आवाहन  प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे यांनी केले.

नगर तालुक्यातील शिराढोण येथे शेतकरी सूर्यभान वाघ यांच्या मका प्लॉटची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे व कृषी आयुक्तालय पुणे येथील कृषी उपसंचालक भास्करराव लोंढे यांनी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी  बाळासाहेब नितनवरे,  शिराढोनचे सरपंच दादासाहेब दरेकर, रोहिदास शिंदे, किशोर रोहोकले, मंडळ कृषी अधिकारी नारायण करांडे, अंकुश टकले, कृषी सहाय्यक डी एन महाडिक, बाळासाहेब भुजबळ, रावसाहेब दरेकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.


पुढे बोलताना नलगे म्हणाले की या किडीची पतंग एका रात्रीत सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास करू शकतात. त्याबरोबर या किडीची प्रजनन क्षमता जास्त असून मादी पतंग तिच्या जीवनक्रमात सुमारे एक ते दोन हजार अंडी घालू शकते. नवीन अमेरिकन लष्करी अळी झुंडीने आक्रमण करत असून काही दिवसात ती पिक फस्त करते. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या किडीचा जीवनक्रम अंडी अळी कोष व पतंग अशा चार अवस्थेत पूर्ण होतो. एक मादी सरासरी 1500 ते 2000 अंडे देऊ शकते. मादी पतंग पानाच्या पुंजक्यात अंडी घालते. एका पुंजक्‍यात शंभर ते दोनशे अंडी असतात अंड्यातून दोन ते तीन दिवसात अळ्या बाहेर पडतात. अळीची वाढ 14 ते तीस दिवसात पूर्ण होते व जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते कोषावस्था आठ ते तीस दिवसांची असते. पतंग जवळ पाच-दहा दिवस जगतात अशाप्रकारे 30 ते 80 दिवसांमध्ये एक जीवनक्रम पूर्ण होतो. ही अळी ओळखण्यासाठी मुख्य खूण म्हणजे अळीच्या डोक्यावर पुढच्या बाजूस उलट वाय आकाराची खूण असतेच व शरीराच्या शेवटून दुसऱ्या सेगमेंट वर चौकोनी आकारात चार ठिपके दिसून येतात व त्या ठिपक्या वर केसही आढळून येताच. नवीन अमेरिकन लष्करी अळीच्या पतंगाचे समोरचे पंख करड्या व तपकिरी रंगाचे असून पंखाच्या टोकाकडे व मध्यभागी पांढरे ठिपके असतात. या पतंगाचे मागील पंख चमकदार पांढरे असतात. पतंग निशाचर असून संध्याकाळीच मिलनासाठी जास्त सक्रिय असतात असे ते म्हणाले.

कृषी उपसंचालक भास्करराव लोंढे म्हणाले की या किडीची अळी अवस्था पिकांना नुकसान पोहोचविते. सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या पानाचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात मोठ्या अळ्या पाने कुरतडून खातात. त्यामुळे त्यांना छिद्रे दिसतात आळी पोग्यामध्ये शिरून आत खाते व पोग्याटापानांना छिद्र पाडते. ही चिन्हे या अळीच्या प्रादुर्भावाची आहेत. या किडीचा प्रादुर्भाव वा मुळे 30 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पन्नात घट येते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी जमिनीची खोल नांगरट करावी अंडीपुंज व आळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. या किडीचे नैसर्गिक शत्रू जसे परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा )व परभक्षी कीटक यांचे संवर्धन करावे या किडीचे पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा व कामगंध सापळ्यांचा वापर करावा. विषारी प्रभोलन तयार करण्यासाठीच दहा किलो भाताचे तूस अधिक दोन किलो गूळ अधिक दोन ते तीन लिटर पाण्याचे मिश्रण करून 24 तास आंबवणे. मिश्रण वापरणे अगोदर अर्धा तास त्यात 100 ग्रॅम थायोडीकार्ब मिसळावे व मिश्रण मका पिकाच्या शेतात टाकावे असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post