गॅसेस का होतात? कारणे आणि उपचार


वेब टीम : पुणे
खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो. म्हातारपणात तर बर्‍याच लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो. लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहीत नसताना हवा गिळण्याची सवय.

खूप बोलणार्‍या लोकांमध्ये (उदा. शिक्षक, राजकीय नेते) अशाप्रकारे जास्त हवा गिळली जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन त्यांचे पोट दुखायला लागते.

मोठ्या आतड्यात सूक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास मल शरीरात साचून राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही दुखते.

गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच जेवावे. हरभर्‍याच्या डाळीचे किंवा तेलकट-तूपकट पदार्थ कमी खावेत.

बैठे काम करणार्‍यांनी भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा.

पवनमुक्तासनासारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात. अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे काम करणार्‍यांनी जेवणानंतर दीड-दोन तासांनी ताठ बसून बेंबी आत ओढून 5 ते 15 सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा.

असा उपाय वारंवार केल्यास गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो. चारचौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि व्यायाम यामुळे आपण आटोक्यात आणू शकू.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post