भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ


वेब टीम : अहमदनगर
भिंगार येथील मानाच्या देशमुख वाडा गणपतीची उत्थानपुजा पोलिस अधिक्षक ईशु सिंधू यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता ब्राह्मणगल्लीतील गणपती मंदिरात करण्यात आली. यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मानाचा गणपती फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवून मिरवणूक काढण्यात आली. पोलिस अधिक्षक ईशु सिंधू देखील या पालखीचे भोई झाले होते.

ब्राह्मणगल्लीतील मानाच्या देशमुख गणपतीचे प्रमुख समीर देशमुख, अश्विन देशमुख, कार्तिक देशमुख यासह शेवगावचे पोलिस उपाधीक्षक मंदार जावळे, काँग्रेसचे आर.आर.पिल्ले, शाम वाघस्कर भाजपच्या नगरसेविका शुभांगी साठे, राष्ट्रवादीचे संजय सपकाळ, शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे, कलगीतुरा मंडळाचे सुनिल कर्डिले आदिंसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. मानाच्या गणपतीचे प्रमुख समीर देशमुख, अश्विन देशमुख, कार्तिक देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

काही वर्षांपूर्वी प्रकाश लुणिया यांनी अर्पण केलेल्या पालखीतून मानाच्या देशमुख गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी शब्बीर सय्यद यांनी फुलांनी सजवली होती. तर सनई चौघडा वादन गयाजभाई शेख यांनी केले. रुद्रनाद ढोलपथकाने मानाच्या गणरायाला पहिली सलामी दिली. यानंतर इतर मंडळे सहभागी झाले होते. एकुण पंधरा मंडळे सहभागी होतील असे कॅम्प पोलिसांनी सांगितले. मिरवणुकीत चौकाचौकात मानाच्या गणरायाचे पूजन करण्यात आले.

दरम्यान नगरमधील मोहरम विसर्जन मिरवणुकीमुळे भिंगारला पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. शेवगावचे पोलिस उपअधिक्षक मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलिस निरीक्षक, 10 पोलिस उपनिरीक्षक 135 पोलिस कर्मचारी, 30 होम गार्ड, स्ट्रॅकिंग फोर्स पथक असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मिरवणूक सुरू होण्यापूर्वी पोलिसांच्या बॉम्ब शोध पथकाने मिरवणूक मार्गाची कसून तपासणी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates