अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सासूचा सुनेने काढला काटा


वेब टीम : कोल्हापूर
अनैतिक संबंध सासूनेच पाहिल्याने बोभाटा होईल, या भीतीने सुनेने प्रियकराच्या साथीने सासूचा खून केल्याची घटना हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे घडली.

श्रीमती बसव्वा मल्लाप्पा पाटील (वय ६०) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी सून मालश्री पाटील (वय २४) व प्रियकर रूपेश लब्यागोळ (वय २४) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत बसव्वा हिला संतोष, यशवंत व शोभा ही तीन मुले आहेत. त्यांच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले. यातील यशवंत हा गेल्या पाच-सहा वर्षापासून बेपत्ता आहे.

 तर मुलगी शोभा हिचा विवाह झाला आहे. त्यामुळे ती मुलगा संतोष व त्याची पत्नी मालश्री हिच्यासोबत हलकर्णी येथील खानापूर रस्त्यालगतच्या घरात राहते. संतोष व मालश्री यांना दोन मुले असून, संतोष याचा स्वतःचा छोटा माल वाहतूक टेम्पो आहे. यानिमित्त तो अन्यत्र प्रवास करीत असतो.

मालश्री हिचे गेल्या काही दिवसापासून गावातील कुणाशी तरी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण सासू बसव्वा व पती संतोष याला लागली होती. ती वारंवार फोनवरून बोलत असल्याने तिला याबाबत सूचना दिली होती.

तरीही तिने या सर्वाला न जुमानता आपले बोलणे सुरूच ठेवले होते. संतोष याला शंका आल्याने त्याने याबाबतची माहिती घेतली असता त्याला गावातील रूपेश लब्यागोळ याच्याशी तिचे अनैतिक संबंध सुरू असल्याचे कळाले होते.

या प्रकरणावरून संतोष याने मालश्री हिला समजावून सांगून ताकीद दिली होती. संतोष याला अथणी येथे भाडे असल्याने रात्री आठच्या सुमारास तो आई व पत्नीला सांगून टेम्पो घेऊन गेला होता.

रात्री उशीर येणार असल्याचे सांगितले होते. यानंतर मालश्री हिने याचाच फायदा उठवित रूपेश याला याची कल्पना दिल्याने रात्री तो संतोष याच्या घरी आला.

या दरम्यान सासू बसव्वा हिला हे दोघेही नको त्या अवस्थेत सापडले. त्यानंतर तिने दोघांनाही शिवीगाळ करीत ‘तुझा पराक्रम नवर्‍याला सांगतो’ असे म्हणताच या दोघांनीही जवळच असलेल्या लाकडी दांडक्याने बसव्वा हिच्या डोक्यात प्रहार केला.

हा प्रहार इतका जबरदस्त होता की, सासू बसव्वा ही अंथरूणातच रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मयत झाली. यानंतर घटनास्थळावरून रूपेश हा पळून गेला. दरम्यान, सकाळी मालश्री हिने अज्ञाताने सासूला मारून टाकल्याचे शेजारीपाजार्‍यांना सांगून गोंधळ घातला.

मुख्य वस्तीपासून हे घर थोडे बाहेर असल्याने अनेकांना सुरुवातीला दरोड्याचा प्रकार भासविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post