पुण्यात हाहा:कार : घर, गाड्या गेल्या वाहून, अनेक जण मृत्युमुखी


वेब टीम : पुणे
शहरात सलग चार तास कोसळलेल्या धुव्वाधार पावसामुळे बुधवारी रात्री हाहा:कार उडाला. बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले. त्यात बरीच वाहने अडकली.

वाहत्या पाण्यामुळे रस्त्यांना अक्षरश: नदी, नाल्याचे स्वरूप आले. बऱ्याच वस्त्या आणि सोसायट्यांत पाणी शिरले.अशा जीवघेण्या थरारनाट्यातून मुठीत जीव घेऊन घरावर तुळशीपत्र ठेवावे लागले.

या पाऊसरूपी संकटात बारा जणांना आपला जीव गमवावा लागला. बरेचजण जखमी झाले. काही भागात गायी म्हशी, कुत्री, मांजरे वाहून गेली. त्यामुळे पशुधनाचेही मोठे नुकसान झाले.घरांत पाणी शिरल्याने संसार उद्वस्त झाले.

भिंती कोसळल्या, बऱ्याच जणांनी माणुसकी दाखवत मदत कार्य करताना जीवाचीही पर्वा केली नाही. कित्येक वर्षानंतर अशा जीवावर बेतणार्‍या कठीण परिस्थितीचा पुणेकरांना सामना करावा लागला. वाहून गेलेल्या वाहनांमुळे अतोनात आर्थिक नुकसानही झाले.

तावरे कॉलनी, बागूल उद्यान, लक्ष्मीनगर, पद्मावती, के.के. मार्केट, बिबवेवाडी, इंदीरानगर या भागातही ओढ्याकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले.

दांडेकर पूल परिसरातही काठावरच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. कोथरूड डेपो परिसरातील शास्त्रीनगर भागात मशिदीमागे असलेल्या एका इमारतीजवळील सीमाभिंत कोसळली.

त्यामुळे पार्किंगमधील सर्व गाड्या पाण्याखाली गेल्या.आजूबाजूची घरे व इमारतीतही पाणी शिरले. कोथरूडमध्ये भुसारी कॉलनीच्या दोन्ही बाजू, शिवतीर्थ नगर, गुजरात कॉलनी, मोरे विद्यालय, एमआयटी परिसरात पाणी साचले होते.

 वारजे, वडगाव, नवले पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे रस्ते ब्लॉक झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post