...आणि ७२ वर्षांच्या आठवणी ताज्या झाल्या! पोलंड मधील नागरिक कोल्हापूर भेटीला


वेब टीम : कोल्हापूर
सन 1942 ची वेळ....दुस-या महायुद्धाला सुरुवात....काही परदेशी नागरिक भारतातील कोल्हापूर येथे आश्रयाला आले....आणि कोल्हापूरकर झाले....युद्ध समाप्तीनंतर ते नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्या मनात कोल्हापूरकर कायम राहिले. ते नागरिक होते पोलंडवासी.....त्याच आठवणींना आज 72 वर्षांनंतर लुडमिला जॅक्टोव्हीझ या महिलेने उजाळा दिला.

1942 ते 1948 या कालावधीत कोल्हापुरात निर्वासित म्हणून राहिलेल्या पाच हजार नागरिकांमधील 27 नागरिकांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. आज या नागरिकांनी पन्हाळा किल्ल्यास भेट देऊन किल्ल्याची माहिती जाणून घेतली. तसेच आपल्या लहानपणीच्या कोल्हापुरातील वास्तव्याच्या आठवणींनाही उजाळा दिला.

सन 1936 ला जन्म झालेल्या लुडमिला या आज 83 वर्षांच्या आहेत. मात्र भारत भेटीचा त्यांचा उत्साह त्यांना तारूण्यात नेणारा होता. त्यामुळे त्या जुन्या आठवणी सांगताना फार उत्साहित होत्या.

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान निर्वासित झालेल्या पोलंडच्या 5000 हजार नागरिकांना भारतातील कोल्हापूर येथील वळीवडे या गावी आश्रय घेतला होता. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्व परदेशी नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्यात भारतातील आठवणी कायम राहिल्या.
पन्हाळा किल्यावरील धान्याचे कोठार (अंबरखाना) व तीन दरवाजा या ठिकाणी भेट देऊन या परिसराची पाहणी करुन किल्ल्याची माहिती जाणून घेतली. रविराज निंबाळकर यांनी पथकातील नागरिकांना पन्हाळा किल्ल्याची रचना, मराठा साम्राज्याबाबत सविस्तर माहिती दिली. किल्ला पाहणीनंतर पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

पन्हाळा किल्ला येथील बाजीप्रभू देशपांडे पुतळा चौकात पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष रुपाली धडेल, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या नगरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पन्हाळा किल्ल्याबाबत यावेळी या नागरिकांना माहिती दिली.  यावेळी  पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसिलदार रमेश शेंडगे यांच्यासह पन्हाळा नगरपरिषदेचे नगरसेवक व मान्यवर नागरिक उपस्थित होते.
मरेपर्यंत माझ्या मनात भारत राहिल - लुडमिला जॅक्टोव्हीझ, पोलंड येथील नागरीक

भारत ही पवित्र भूमी आहे. या भूमीत वास्तव्यास असताना मी 11 वर्षाची होती. आईने माझ्या हातात घातलेल्या दोन बांगड्या आजही आहेत. कोल्हापूरची ही आवठवण मी आजही माझ्यासोबत ठेवली असल्याची भावना लुडमिला जॅक्टोव्हीझ यांनी यावेळी व्यक्त केली.
वळीवडे येथे 1942 ते 1948 या कालावधीत लुडमिला या आईसमवेत राहात असताना आईने वळीवडे येथे कॅम्प मध्ये हातात घातलेली बांगडी पोलंडच्या निर्वासित महिलेने आठवण म्हणून जपून ठेवली आहे. 72 वर्षांपासून हातात असलेली बांगडी असून भारतातील शाहू महाराजांच्या भूमीची आठवण जपून ठेवल्याचं त्यांनी यावेळी सांगितले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post