मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता


वेब टीम : पुणे
मुंबईत रविवार पासून पावसाची संततधार असून आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. मुंबईत गिरगाव, दादर, भायखळा, करिरोड, घाटकोपर, चेंबूर, गोवंडी, मुलुंड, वरळी या परिसरात पावसाने दुपारी जोरदार हजेरी लावली.

संततधार पावसाने आज दुपारनंतर मुंबईत चांगलाच जोर धरला. गणेश आगमनाच्या मिरवणुका सुरू असतानाच पावसाने जोर धरल्याने गणेश भक्तांची तारांबळ उडाली होती.

मुंबईत रविवारी सांताक्रुझ येथे १४.२ मिमी तर कुलाबा येथे ६.६ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती वेधशाळेने दिली. तर गेल्या २४ तासांत सांताक्रुझ येथे १५.७ मिमी तर कुलाबा येथे ५ मिमी पावासाची नोंद झाली. कुलाब्याचे किमान तापमान २७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले ते नेहमीच्या सामान्य तापामानपेक्षा ३ अंशांनी कमी होते.

सांताक्रुझचे किमान तापमान २७.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते नेहमीच्या सामान्य तापमानापेक्षा २.७ अंशाने कमी होते. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून ४ सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post