मनसे १०० जागा लढविणार : राज ठाकरे करणार घोषणा


वेब टीम : मुंबई
गेल्या काही दिवसांपासून काहीसे शांत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा घेणार आहे.

या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत असे समजते आहे. मुंबईतील वांद्रे या ठिकाणी असलेल्या एमआयजी क्लब या ठिकाणी हा मेळावा घेतला जाणार आहे.

राज ठाकरे या मेळाव्यात सगळ्या इच्छुक उमेदवारांसोबत संवाद सांधणार आहेत अशी माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली आहे. या मेळाव्यात राज ठाकरे विधानसभा निवडणुकीची रुपरेषा ठरवणार असल्याचीही शक्यता आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कडाडणार असल्याचे बोलले जात आहे.


लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. खासकरुन मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी भूमिका घेतली होती. त्यांचं ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्यही चांगलंच प्रसिद्ध झालं होतं.

आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे बहुदा सोमवारी स्पष्ट होऊ शकतं. कारण मनसे 100 जागा लढवणार अशीही माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती.

मात्र त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. कदाचित हीच घोषणा राज ठाकरे सोमवारी करण्याची शक्यता आहे.

निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी आग्रही भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक ईव्हीएमवरच होणार हे स्पष्ट केले त्यामुळे मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही अशी चर्चा होती.

मात्र मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून राज ठाकरे यांनी त्यांचा निर्णय बदलला आहे असेही समजते आहे. मनसेचा मेळावा सोमवारी होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक लढवताना मनसेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घेतील असा अंदाज लावला जात होता. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे मनसे काय करणार हा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता. आता या प्रश्नाचे उत्तर सोमवारी मिळण्याची चिन्हं आहेत.

मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसने विरोध दर्शवला नाहीतर माझी काही हरकत नव्हती असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. आता राज ठाकरे काय करणार, सोमवारी मोठी घोषणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post