नगर शहराच्या अनेक भागात नळावाटे दूषित पाण्याचा पुरवठा


वेब टीम : अहमदनगर
शहरातील विविध भागात नळावाटे नागरीकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत आणि त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही गेल्या कित्येक वर्षांपासून बदलली गेली नसल्यामुळे ती ठिकठिकाणी खराब झाली आहे. अनेक ठिकाणी फेज 2 ची पाईपलाईन टाकण्याचे काम रखडले आहे, तर ज्या भागात फेज 2 ची पाईपलाईन टाकली आहे तिच्यातून पाणी पुरवठा अद्याप सुरु झालेला नसून पाणीपुरवठा सध्या जुन्याच पाईपलाईनवर सुरु आहे.

शहरात गेल्या अनेक वर्षांपासून ठिकठिकाणी नाल्या व रस्ते खोदण्यात आले होते. ते खोदताना अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे. ती व्यवस्थितपणे दुरुस्त केलेली नाही, अनेक नागरिकांनी अनधिकृतपणे नळ जोड घेवून नंतर तसेच उघडे ठेवलेले आहेत. अशातच काही ठिकाणी ही पाईपलाईन नालीमधून गेल्यामुळे पाईपलाईन फुटल्यास नालीमधील घाण पाणी या पाईपलाईनमध्ये घुसते. हे घाणमिश्रीत पाणी पिल्यामुळे नागरीकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. या सर्व कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी नागरीकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

काटवन खंडोबा परिसरात नळाद्वारे मैलमिश्रीत पाणी
शहरालगत असलेल्या सिनानदी पलिकडील काटवन खंडोबारोड येथील गाझी नगर भागात मागील 15 ते 20 दिवसांपासून नळाद्वारे मैलमिश्रीत पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दिवासाआड पाणी सुटून देखील मैलमिश्रीत येत असल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर दुषित पाण्यामुळे अनेक नागरिक व लहान मुले आजारी पडले आहेत. मनपाची पाणीपट्टी भरुन देखील पुरेश्या दाबाने व शुध्द पाणी मिळत नसल्याने शुध्द पाणी देता का पाणी? म्हणण्याची वेळ नागरिकांवर ओढवली आहे. पिण्यायोग्य पाणी नसल्याने या भागातील महिलांसह मुलांना इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. प्रत्येक घरात एक रुग्ण अशी अवस्था या भागाची झाली आहे. तातडीने सदर प्रश्‍न मार्गी लावून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिक करत असून, सदर प्रश्‍नाकडे स्थानिक नगरसेवक गांभीर्यपुर्वक लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. याभागात अनेक नळ कनेक्शन देखील बेकायदा असल्याने यापुर्वी देखील नागरिकांनी यासंदर्भात तक्रार केली होती. पावसाळ्यात देखील याभागात पाणीटंचाई जाणवत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post