आम्ही नेवाशाची कीड तर आ. मुरकुटे बांडगुळ : यशवंतराव गडाख


वेब टीम : अहमदनगर
गडाख नेवासा तालुक्याच्या विकासाला लागलेली कीड असल्याचा बेछूट आणि बेजबाबदार आरोप करणारे आमदार बाळासाहेब मुरकुटे हे तालुक्याला लागलेले व फस्त करायला निघालेले बांडगुळ असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी करून त्यांच्या असल्या राजकीय कार्यपद्धतीमुळे तालुक्याचा उन्हाळा होण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे 20 हजार कार्येकर्त्याचा महामेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते गडाख यांनी विविध मुद्द्यांना हात घालतांना सांगितले की, पाण्याची अवस्था काय झाली आहे हे सर्वांना ठाऊक आहे .अनेक पिके जळून गेली जर पाऊस आला नसता तर काय अवस्था झाली असती . आपलं पाणी खाली चालले आहे आता तर सुमारे 2 टी म सी पाणी बीडला देण्याचा निर्णय झाला आहे . यावर तालुक्याचा आमदार काही बोलत नाही . शंकरराव आमदार असतांना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी व अकोले तालुज्यात धरणे बांधली जात असताना आपल्याच सरकारचे जेष्ठ मंत्री पिचड यांच्याशी वाईटपणा घेतला .

मुळा कारखाना हा कुणाच्या मालकीचा नसून तो सभासद शेतकऱ्यांचा आहे . गेल्या 30 वर्षात कारखान्याने 2300 कोटीचे पेमेंट दिले तोडणी वाहतूक ,पगार यावर 1030 कोटी दिले गेले या कारखान्याची प्रॉपर्टी 250 कोटींची असून हे सर्व आपल्या सहकार्याने झाले आहे . शंकरराव यांनी धाडसाने जिल्ह्यात पहिला वीज प्रकल्प चालू करून सर्व कर्ज फेडून 150 कोटींची वीज शासनाला देत आहे आपल्या सर्व संस्थेतून आजपर्यंत सुमारे 85 हजार मुले शिकून बाहेर गेले आहेत . आणखी काही त्यांचे प्रकल्प उभे करून तालुक्यातील सुमारे 2000 हजार तरुणांना रोजगार देण्याची कल्पना आहे .

पाण्याच्या प्रश्नांवर तसेच जनतेच्या विविध मागण्यांसाठी लढत आहे याउलट तालुक्याचे आमदार काहीही करत नसतांना शंकरराव हे तालुक्याला लागलेली कीड असल्याचे बोलत आहे याचा तुम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे . इतिहास माहीत नसतांना इंग्रजांनंतर मी तालुक्याचा विकास केला असल्याचे जाहीर भाष्य लोकप्रनिधींनी केल्याबद्दल गडाख यांनी आश्चर्य व्यक्त केले .

यावेळी बोलताना माजी आमदार शंकरराव गडाख यांनी तालुक्यात विकास कामांपेक्षा गडाख कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन शिव्याशाप देण्याचे घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. आपल्या काळात एकदाही मुळा धरण भरलेले नसतानाही लाभक्षेत्रात तीन आवर्तनाचे यशस्वी नियोजन केल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. पाटपाण्याचे नियोजन करणे ऐर्यागैर्याचे काम नाही हे गेल्या पाच वर्षांत सर्वांनी अनुभवल्याचा टोला त्यांनी लगावला.

मागील वर्षी मुळा धरणात 23 टीएमसी पाणीसाठा असताना तालुक्याला अवघे एक आवर्तन मिळाल्याने दुष्काळात 80 गावांत पिण्याचे टँकर सुरू करावे लागले, उसाच्या खोडक्या झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आपल्या काळात धरणात अवघा साडेसहा टीएमसी पाणीसाठा असताना व धारण जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असताना राजकीय ताकद पणाला लावून प्रसंगी संबंधितांना ठणकावून त्यातून तालुक्यातील 350 साठवण बंधारे व तलाव भरून घेतल्याने भर दुष्काळातही पिकांचे पान वाळू न दिल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

आमदार मुरकुटेच्या कार्यकाळात पाटपाण्यासाठी आग्रह धरणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकरवी मारहाण करण्यात येऊन गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबण्यात आल्याच्या दुर्दैवी घटनांकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. समन्यायी पाणी वाटप कायदा विधानसभेने संमत केलेला असताना त्याचे खापर काहीही कारण नसताना एकट्या गडाखांवर फोडले जाते याची खंत व्यक्त करून जायकवाडीला पाणी जात असताना त्याला विरोध करण्याची हिंमत का दाखविली नाही, असा कळीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. साखर कारखान्याचा राजकीय वापर केला असता तर मला पराभूत करण्याची कोणात दानत नव्हती असे ठणकावून सांगत त्यांनी हे पाप आपण केले नसल्याचे समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यातील काही दिग्गज नेते काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्वकाही भरभरून दिलेले असतानाही सुरक्षित राजकारण करण्यासाठी पक्षांतर करत असल्याची उदाहरणे दिसून येत असली तरी आपण मात्र कुठेही न जाता क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्याच माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे ठाम धाडसी निर्धार त्यांनी यावेळी जाहीर केला. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्तपणे जोरदार प्रतिसाद दिला.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post