बालिकेचा विनयभंग करणार्‍यास चार वर्षाची शिक्षा


वेब टीम : जळगाव
बारा वर्षीय बालिकेचा विनयभंग करणार्‍या 55 वर्षीय आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 4 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने 25 सप्टेंबर 2015 रोजी पीडित बालिकेला भांडी धुण्याच्या बहाण्याने घरात बोलवून तिचा विनयभंग केला होता.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुनखेडा येथील रहिवासी पीडित 12 वर्षीय बालिका ही दि. 25 सप्टेंबर 2015 रोजी शाळेला सुट्टी असल्याने घरी एकटीच होती. दरम्यान दुपारी 1 वाजेच्या सुमारास पीडित बालिका जि.प. शाळेकडे खेळण्यासाठी जात असतांना शाळेजवळ राहणार्‍या गणपत श्रावण भिल्ल (सोनवणे)(वय 55) याने पीडित बालिकेला भांडी धुवून दे, मी पैसे देतो असे म्हणत घरात बोलविले. भांडी धुवून झाल्यावर बालिका धुतलेली भांडी घरात ठेवण्यासाठी गेली असता गणपत भिल्ल याने घराचा दरवाजा आतून बंद करुन पीडित बालिकेचा विनयभंग केला. या घटनेनंतर पीडित बालिका ही भितीपोटी घरातील पलंगाखाली लपून बसलेली होती.

दरम्यान शेजारी राहणार्‍या आजीला संशय आल्याने तिने पीडित बालिकेच्या आई व आजीला माहिती दिल्याने त्यांनी गणपत याचे घर गाठत दरवाजाला धक्का मारुन दरवाजा उघडला असता घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी गणपत भिल्ल याच्या विरुध्द विनयभंगासह बाल लैगिंक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात त्याला अटक होत जामीन झाला होता. जामिनानंतर तो फरार होता. त्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात येवून या प्रकरणी न्यायालयात कामकाज सुरु होते.


पीडितेची साक्ष ठरली महत्त्वाची
या प्रकरणी जळगाव सत्र न्यायालयात कामकाज होत एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित बालिका, तिची आई, आजी आदींचा समावेश होता. यात पीडित बालिका हिची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार दि. 18 रोजी न्या. श.गु. ठुबे यांच्या कोर्टात कामकाज पूर्ण होत न्यायालयाने आरोपी गणपत याला भादंवि कलम 342 अंतर्गत 6 महिने साधी कैद, 354 (ब) अंतर्गत 4 वर्ष साधी कैद व बाल लैंगिक अत्याचार (7) अंतर्गत 4 वर्ष साधी कैद व 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दीड महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. शीतल गोळंबे यांनी काम पाहिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post