हडपसरमध्ये शिवसैनिक भाजप उमेदवाराला धडा शिकविण्याच्या तयारीत


वेब टीम : पुणे
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर 2014 साली हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या योगेश टिळेकर यांनी बाजी मारली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

त्यानंतर टिळेकर यांच्या माजी आमदार महादेव बाबर आणि नगरसेवक वसंत मोरे यांच्याशी वारंवार होणाऱ्या संघर्षामुळे हडपसरमध्ये बराच काळ राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यातच, रविवारी सायंकाळी कोंढव्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आपला नेता निवडणूक लढणारच, असा निर्धार केला.

हडपसर मतदारसंघ हा युतीमध्ये आपल्याला मिळावा, यासाठी शिवसेनेकडून पहिल्यापासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, विद्यमान आमदारांनी हडपसरसह शहरातील एकही मतदारसंघ शिवसेनेला देणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

त्यातच, युतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू असताना रविवारी कोंढव्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि शिवसैनिकांनी टिळेकर यांच्याविरोधात निवडणूक लढवायचीच, असा निश्चय केला.

हडपसर मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडल्यास महादेव बाबर आणि नगरसेवक प्रमोद भानगिरे हे इच्छुक आहेत. तर, टिळेकर हे विद्यमान आमदार असल्यामुळे हा मतदारसंघ ताब्यात राहावा, यासाठी ते शक्य तितके प्रयत्न करत आहेत.

भाजपला हडपसर मतदारसंघ सोडल्यास, बाबर हे टिळेकर यांच्याविरोधात दंड थोपटणार की, युतीचा धर्म पाळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बाबर यांच्यापुढे राष्ट्रवादीमध्ये जाऊन निवडणूक लढवण्याचा पर्यायदेखील उपलब्ध असणार आहे.

परंतु, बाबर हे मुरब्बी राजकारणी असल्यामुळे तडकाफडकी निर्णय न घेता, कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आणि परिस्थितीचा विचार करूनच ते पुढची दिशा ठरवतील.

मनसेचे वसंत मोरे हेदेखील हडपसरमधून इच्छुक असून, त्यांच्या उमेदवारीचा काही प्रमाणात टिळेकर यांना फायदा होऊ शकतो, असे प्रथमदर्शनी बोलले जात आहे.

टिळेकर यांचे बाबर यांच्यासोबत असलेले वाद हा सर्वांनाच परिचीत आहेत. उड्डाणपूल, भूयारी मार्ग किंवा इतर कोणत्याही कामासंदर्भात असणारी श्रेयवादाची लढाई यांमुळे टिळेकर आणि बाबर यांच्यात वारंवार ठिणगी पडल्याचे समोर आले आहे.

त्यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांची टिळेकर यांच्यासोबतची लढाई हडपसरकर अद्याप विसरू शकले नाहीत. त्यामुळे यंदा हडपसर विधानसभेमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळणार हे नक्की आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post