छत्तीसगड : चकमकीत नक्षलवादी ठार


वेब टीम : रांची
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका नक्षलवाद्याला ठार केले.

या वेळी जिल्हा राखीव दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला, तर कारवाईपूर्वी एका जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले,असे पोलिसांनी सांगितले.

ही चकमक सुरक्षा दलाची दोन स्वतंत्र पथके नक्षवादविरोधी कारवाई करताना पितेपाल गावाजवळ सकाळी नऊ वाजता घडली.

दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील काटेकल्याण जंगल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर माओवादी असल्याची खबर मिळाल्याने सुरक्षा दलाच्या जवळपास ४०० जवानांना तेथे पाठविण्यात आले. या नक्षलवाद्यांची मोठा हल्ल्याची योजना होती.

एक पथक पितेपाल गावातील जंगलास वेढा घालत असताना दोन्ही बाजूंनी गोळीबारास सुरुवात झाली. मात्र नक्षलवादी लवकरच घनदाट जंगलात पसार झाले.

त्यानंतर घटनास्थळी शोध घेतला असता एका नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाला. त्याच्याकडील देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन मॅगझीन्स हस्तगत केले. या नक्षलवाद्याची ओळख अजून पटलेली नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post