मारुतीची एसयूव्ही 'एस-प्रेसो' अवघ्या ३.६९ लाखांत


वेब टीम : दिल्ली
मारुती सुझुकीने सोमवारी छोट्या एसयूव्ही गटातील बहुप्रतीक्षित 'एस-प्रेसो' बाजारात सादर केली. 'एस-प्रेसो' रचना आणि संकल्पना पूर्णपणे भारतीय असली तरी ही कार संपूर्ण जगासाठी निर्माण करण्यात आली आहे. गाडीची नवी दिल्लीत एक्स शोरूम किंमत ३.६९ लाख ते ४.९१ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. प्रतिलिटर २१.७ किमी ॲव्हरेज देण्याची क्षमता असलेल्या एक लिटरचे बीएस-६ पेट्रोल इंजिन या कारला बसवण्यात आले आहे. .

एस-प्रेसो कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही गिअर सिस्टीममध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच ड्युएल एअरबॅग, ईबीडीसह अँटी लॉकब्रेकिंग सिस्टीम (एबीएस), लिमिटर्स, रियर पार्किंग सुविधा, वेग जास्त झाल्यास इशारा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, अशा अनेक सुविधांचा या कारमध्ये समावेश आहे. आपल्या दमदार आणि आकर्षक रुपामुळे ही गाडी उठून दिसते.

पाचव्या पिढीच्या 'हीअरटेक्ट' व्यासपीठावर तयार करण्यात आलेली ही गाडी अधिक मजबुती आणि सुरक्षिततेसाठी ४० टक्के हाय टेन्साईल स्टीलपासून तयार करण्यात आली आहे. देशभरातील व्यापक एरेना रीटेल नेटवर्कच्या माध्यमातून 'एस-प्रेसो' ची विक्री केली जाणार आहे आणि सर्व सुरक्षितता नियमांचे पालन करत यात १० हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये पुरवण्यात आली आहेत. 'एस-प्रेसो' सह ग्राहकांना सुझुकीतर्फे या विभागातील सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवण्यात येत आहेत.

ग्राहकांसाठी नवी 'एस-प्रेसो' सादर करताना मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केनिची आयुकावा म्हणाले, मारुती सुझुकीमध्ये आमचा 'ग्राहक प्रथम' या तत्त्वावर विश्वास आहे. परवडणाऱ्या दरांमध्ये उच्च दर्जाच्या गाड्या भारतीय ग्राहकांना पुरवण्याचे आमचे कार्य सातत्याने सुरू आहे.

आज एस-प्रेसोच्या जागतिक अनावरणामुळे आम्ही ग्राहकांना डिझाइन, तंत्रज्ञान आणि सुरक्षेची सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्याची बांधिलकी जपली आहे. नव्या उत्सर्जन नियमांचे पालन करणाऱ्या बीएस६ रेंजमधील एस-प्रेसो ही आठवी गाडी आहे, याचा मला आनंद आहे. सतत उत्क्रांत होणाऱ्या तरुण ग्राहकांना आकर्षित करून एस-प्रेसो या विभागात उत्साह निर्माण करेल, असा मला विश्वास आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post