जेलमधून निवडणूक लढवून 'हा' उमेदवार पोहोचला थेट विधानसभेत


वेब टीम : गंगाखेड
महादेव जानकरांच्या रासपचे उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टेंनी गंगाखेडमधून शिवसेनेच्या विशाल कदम यांच्या विरोधात निवडणूक लढवली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघात महायुतीच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेली काट्याची टक्कर लक्षणीय ठरली.

विशेष म्हणजे आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेले रत्नाकर गुट्टे मतदारांसमोर एकदाही न जाता जेलमधून थेट विधानसभेत जाण्याचा विक्रम घडवला आहे.

गंगाखेड शुगर्सचे संचालक असलेले गुट्टे हे मागील सहा महिन्यांपासून परभणीच्या कारागृहात आहेत. शेतकर्‍यांच्या नावे कोट्यावधी रुपयांचे कर्ज उचलल्याचा त्यांच्यावर गुन्हा आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. केंद्रे, माजी अपक्ष आ.सीताराम घनदाट, वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर, अपक्ष संतोष मुरकूटे असे सहा दिग्गज रिंगणात असतांना येथील लढत अत्यंत बहुरंगी अशी ठरेल अशी शक्यता होती.

मात्र अखेरच्या टप्प्यात महायुतीच्याच शिवसेना व रासप या दोघांमध्ये ही लढत रंगली. त्यामुळे अन्य दिग्गज या स्पर्धेत कुठेही फारसे टिकले नाहीत.

गुट्टे यांनी तब्बल 18 हजार 800 मतांचे मताधिक्य मिळवले. त्यांनी शिवसेनेच्या विशाल कदम यांना पराभूत केला. या दोघांतील लढतीमुळे माजी आ. सिताराम घनदाट, राष्ट्रवादीचे विद्यमान आ. डॉ. मधुसूदन केंद्रे हे या स्पर्धेत कुठेही टिकू शकले नाहीत.

महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटून जिल्हाप्रमुख विशाल कदम हे रिंगणात आलेले असतांना अखेरच्या दिवशी कारागृहात असलेले डॉ. गुट्टे यांनी रासपच्या तिकीटावर रिंगणात उडी घेतली. त्याचवेळी या मतदारसंघातील महायुती संपुष्टात आल्याचे चित्र समोर होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post