फडणवीसांनी दिला राजीनामा ; भाजपा सरकार अवघ्या ७८ तासांत कोसळले


वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुपारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपा २ सरकार अवघ्या ७८ तासांत कोसळले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नवं सरकार बनविणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ असो, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला.

तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या विरोधात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.२६) सकाळी यावर निर्णय देत बुधवारी (दि.२७) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.

या घडामोडी घडत असताना अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत पवार कुटुंबात फूट पडत असल्याचं दिसून येत असल्याने शरद पवारांनी हालचाली सुरू केल्या होत्या.

सोमवारी (दि.२५) रात्री महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांचे शक्तिप्रदर्शन केल्यानंतर अजित पवारांशी संपर्क साधला गेल्याची माहिती समोर आली होती.

अजित पवार राष्ट्रवादीच्या संपर्कात असून त्यांचे बंड शांत करण्यात यश येईल, असं सांगण्यात आलं होतं. अजित पवारांच्या समर्थक आमदारांच्या गटालाबरोबर घेऊन फडणवीसांनी राज्यात भाजपाचे सरकार स्थापन केले होते.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी केली होती.

जयंत पाटील यांना विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्याबाबत राज्यपालांना आणि विधान मंडळाला कळविण्यात आलं होतं.

त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं, सर्वोच्च न्यायालयानंही उद्या बहुमत सिद्ध करण्यास राजकीय पक्षांना आदेश दिले होते. भाजपा आणि अजित पवारांच्या सरकारकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० तासांचा अवधी होता.

 तत्पूर्वीच अजित पवारांनी दुपारी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही राजीनाम्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपा २ सरकार अवघ्या ७८ तासांत कोसळले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post