भीषण आग लागून फर्निचरचे दुकान जळुन खाक


वेब टीम : अहमदनगर
बालिकाश्रम रोडवरील चिंतामणी हॉस्पिटलसमोर असलेल्या न्यु टाईम्स स्टील अॅण्ड फर्निचर या दुकानाला अचानक आग लागल्याने दुकानातील लाखो रूपयांचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

गुरूवारी (दि.21) पहाटे 2.30 च्या सुमारास ही घटना घडली. फर्निचरचे दुकान असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले होते. संपुर्ण माल जळेपर्यंत आगीचे तांडवच पहायला मिळाले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, राजु म्याना यांचे बालिकाश्रम रोडवर न्यु टाईम्स फर्निचर म्हणुन फर्निचरचे दुकान आहे. गुरुवारी (दि.21) पहाटे 2.30 च्या सुमारास अचानक या दुकानाला आग लागली.

ही बाब परिसरात राहणार्‍या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला कळविले. संपुर्ण फर्निचरचेच दुकान असल्याने आग जोरात पसरण्यास सुरूवात झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या आरिफ इनामदार, अशोक काळे (ड्रायव्हर), रामदास औटी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र आगीचे रौद्र रूप पाहुन एका गाडीत आग विझण्यासारखी नव्हती म्हणुन ताबडतोब एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाची गाडीही मागविण्यात आली. त्यानंतर मनपाच्या अग्निशमन विभागाच्या बाळु घाटविसावे, दत्तु शिंदे, अशोक पटारे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र दुकानातील संपुर्ण माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दुकान पत्र्याचे व त्यात आतमध्ये संपुर्ण लाकडी फर्निचर असल्याने आग जोरात पसरली.

यावेळी मात्र सावेडी अग्निशमन दलाची गाडी पाचारण करता आली नाही. कारण ती गाडी खराब असल्याचे कळाले. अग्निशमन विभागाला गाड्या देऊनही वेळेवर गाड्या उपलब्ध होत नसल्याने यावेळी नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला.

गाड्या खराब असणे ही बाब नित्याचीच झाली आहे. गाड्यांची योग्य देखभाल केली जात नसल्यानेही वेळेवर सगळी व्यवस्था असतानाही नागरिकांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे दिसते. प्रत्येकवेळी शहरात मोठी घटना घडली की अग्निशमन विभागाकडे योग्य सोयी सुविधा नसल्याचे बोलले जाते. मात्र ज्या सोयी उपलब्ध आहेत त्यांची निगा योग्य ठेवली जात नसल्याचे वारंवार घडणार्‍या घटनांमध्ये ठळकपणे दिसुन येते.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी न्यु टाईम्प फर्निचरचे राजू म्याना यांनी दिलेल्या माहितीवरुन जळीताच्या घटनेची नोंद केली. पुढील कारवाई तोफखाना पोलिस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post