भाजपकडून घोडेबाजार; काँग्रेसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू : अशोक चव्हाण


वेब टीम : मुंबई
सत्ता टिकवण्यासाठी भाजपकडून काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले, आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधण्यात येत असून अनेक प्रलोभने दाखवली जात आहेत.

त्यामुळे आम्ही आमच्या आमदारांना सुरक्षितस्थळी एका हॉटेलात ठेवले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवलं आहे तिथेच रुम बुक केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे बहुमताचा आकडा आहे.

मात्र भाजपकडे संख्याबळ नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

राज्यातल्या सत्तापेचाबाबत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. रविवारी या अर्जावर सुनावणी झाली असली तरी सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

याबाबत ‘कोर्टाने शक्य तितक्या लवकर या प्रकरणी निर्णय द्यावा. सुनावणीत वेळ गेल्यास भाजपला जास्त वेळ मिळेल. जेवढा जास्त वेळ तेवढे जास्त आमदार ते फोडतील त्यामुळे कोर्टाने या प्रकरणात वेळ लावू नये,’ असं चव्हाण म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post