... तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर भाजपात अन्याय झाला नसता : खडसे


वेब टीम : जळगाव
गेले कित्येक दिवस भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांनीही जाहीरपणे पक्षात आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगितले होते.

त्यातच खडसेंनी ‘आज गोपीनाथ मुंडे आपल्यात असते तर माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाला नसता’, अशी खंत व्यक्त केली आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी एकनाथ खडसे बुधवारी सायंकाळी भगवान गडावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते बोलत होते. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत खडसे म्हणाले, मुंडे यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भाजपमध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. आता गोपीनाथ मुंडे असते तर… अशा चर्चा देखील होत आहेत.’

आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मुंडे हे एक आधार वाटत होते. आज ते असते तर कदाचित भाजप आणि सेनेतील युती कायम राहिली असती. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांची भूमिका कायम समन्वयाची असायची.

ते असते तर आज भाजपची जी अवस्था आहे, त्यापेक्षा निश्चितच चांगली अवस्था राहिली असती, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही खडसे यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post