बुलेट ट्रेन प्रकल्प खर्चिक; तो बंद करणार : पृथ्वीराज चव्हाण


वेब टीम : मुंबई
बुलेट ट्रेनची योजना राज्याला परवडणारी नाही. हा प्रकल्प अत्यंत खर्चिक आहे. त्यामुळे हा प्रकल्प आम्ही बंद करणार आहोत, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपद गेल्याने देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले आहेत.

नव्या सरकारला काम करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी द्यायचा असतो असा संकेत आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साधा हा संकेत पाळला नाही. मुख्यमंत्रिपद मिळवण्याचा डाव हुकल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्याच वैफल्यातून ते सरकारवर टीका करत आल्याचे चव्हाण म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. याबाबत विचारता, त्या राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र, आडनावावरुन टीका करणे हे वैफल्याचे लक्षण आहे. त्यांनी व्यक्तिगत टीका करण्याऐवजी सरकारच्या धोरणात्मक निर्णयांवर खुशाल टीका करावी असे मतही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

भाजपने साम, दाम, दंड वापरून विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. अनेक नेत्यांना धमक्या देण्यात आल्या. नेत्यांना नाक घासायला लावून त्यांचे पक्षांतर करून घेतले. म्हणूनच भाजपला रोखण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. प्रत्येक पक्ष आपआपले मंत्री ठरवतील. येत्या दोन दिवसांत मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी या संदर्भात जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.

पण तरुणांना आणि दोन-तीन वेळा निवडून आलेल्या आमदारांना संधी मिळायला हवी, असे चव्हाण यांनी सांगितले. मला विधानसभा अध्यक्षपदासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, आम्ही नाना पटोलेंच्या नावाला पसंती दिली, असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post