वाडिया पार्कमधील ते अतिक्रमण अखेर जमीनदोस्त


वेब टीम : अहमदनगर
वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुलाच्या बाहेरच्या बाजूस अनधिकृतपणे बांधण्यात आलेले पक्के बांधकाम (बिल्डींग-बी) महापालिकेने शनिवारी (दि.14) सकाळी पाडण्यास सुरुवात केली. मागील रविवारी (दि.8) थांबवलेली पाडापाडी पुन्हा सुरु केल्यानंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

नगरमधील वाडियापार्क मैदान हे क्रीडा संकुल समितीला नगरपालिका असताना देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पहिला बीओटी तत्त्वावरील क्रीडा संकुलाचा हा प्रकल्प नगरमध्ये राबविण्यात आला असला तरी अद्यापही तो पूर्ण झालेला नाही.

आतील अॅथलेटिक्स, हॉकी व फूटबॉल या खेळांच्या मैदानासाठी सरकारकडून निधी आलेला नाही. खासगीकरणातून आतील बाजूस स्टेडियमच्या पायर्‍या झाल्या आहेत तर याच कामात बाहेरच्या बाजूस बांधण्यात आलेल्या व्यावसायिक गाळ्यांचा वाद न्यायप्रविष्ट आहे.

हे बांधकाम वाढीव असल्याचा दावा करून तत्कालीन नगरपालिका जिल्हा क्रीडा संकुल समितीविरोधात न्यायालयात गेली आहे. या क्रीडा संकुलाच्या आवारात बाहेरच्या बाजूने उभारण्यात आलेल्या दोन इमारतींचा (बिल्डींग ए व बी) वाद न्यायप्रविष्ट असून येथे अतिरिक्त बांधकाम केल्यामुळे प्रशासनाने या इमारतींमधील गाळ्यांना सील ठोकले आहे.

पार्किंगच्या जागेत हे गाळे बांधले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानेच ही कारवाई करण्यात आली होती. मागील पाच वर्षांपासून हा वाद न्यायालयात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.14) सकाळी अचानक मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्यासह पथकाने दोन जेसीबीद्वारे ’बी’ बिल्डींगचे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.

’बी’ बिल्डींगमध्ये 100 वर गाळे आहेत. त्यापैकी काही व्यवसायिकांना देण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेल्या पाडापाडीत तळमजल्यावरील गाळ्यांचे शटर व विटांच्या भिंती पाडण्यात येत आहे. ’बी’ बिल्डींगचे पाडापाडीचे काम झाल्यानंतर ’ए’ बिल्डींगचे पाडापाडीचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post