अहमदनगर : महापालिका पोटनिवडणूक, भाजप विरुद्ध शिवसेना - राष्ट्रवादी


वेब टीम : अहमदनगर
महापालिकेच्या प्रभाग क्र.6 अ च्या रिक्त जागेच्या पोटनिवडणूकीसाठी गुरुवारी (दि.6) 16 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रभागात एकूण 13621 मतदार असून त्यात त्यापैकी किती टक्के मतदान होते याची उत्सुकता आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना व भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महापालिकेच्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत या प्रभागात 55 टक्के मतदान झाले होते. 4 पैकी तीन जागेवर भाजपाचे तर एका जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. 6 अ ही जागा अनुसूचीत जाती महिलेसाठी राखीव असून या ठिकाणी शिवसेनेच्या सारिका भूतकर या निवडून आल्या होत्या. मात्र त्यांचे जात पाडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत शिवसेनेच्या अनिता दळवी व भाजपाच्या पल्लवी जाधव यांच्यात सरळ लढत होत आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी झालेली असल्याने काँग्रेस राष्ट्रवादीने या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी ही निवडणूक महाआघाडी विरुद्ध भाजपा अशी झालेली आहे.

राज्यातील महाआघाडीचा प्रयोग नगरमध्येही या पोटनिवडणुकीत राबविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दोन दिवसापुर्वी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयात जावून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा, अशी विनंती केली. आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीच्या पदाधिकारींनीही शेवटचे दोन दिवस शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात प्रचार फेर्‍या काढल्या. मात्र शिवसेनेत गटबाजी सुरू झालेली असल्यामुळे उपनेते अनिल राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या गटाची स्वतंत्र फेरी तर संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर व काही नगरसेवक यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसोबत स्वतंत्र प्रचारफेरी काढल्याने शिवसेनेतील ही गटबाजी प्रखरपणे समोर आली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा किती फरक या निवडणुकीवर पडेल? याबाबतीत उत्सुकता आहे. दुसरीकडे सदरचा प्रभाग हा महापौर बाबासाहेब वाकळे यांचा प्रभाग असल्याने या प्रभागातील अन्य तीनही नगरसेवक भाजपाचे असल्याने भाजपाकडून ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आलेली आहे. प्रचाराच सर्व धुरा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारत? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post