वेब टीम : अहमदनगर कर्जत पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधुन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी रविवारी (दि.9) ला रात्री 7.30 च्या सुमारास लॉकअप तोडुन पस...
वेब टीम : अहमदनगर
कर्जत पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधुन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी रविवारी (दि.9) ला रात्री 7.30 च्या सुमारास लॉकअप तोडुन पसार झाले होते. त्यातील तीन आरोपींना पोलिसांनी पुणे-दौंड परिसर पिंजुन मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे अटक केली.
याबाबतची माहिती अशी की, अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत (दोघे रा. जामखेड), ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (रा. जवळा, जामखेड), गंगाधर लक्ष्मण जगताप (रा. महाळंगी, कर्जत), मोहन कुंडलिक भोरे (रा. कौडगाव, जामखेड) हे जेलच्या छतावरील प्लायवुड कटरच्या साह्याने कट करून कौल काढून पसार झाले होते.
परंतु लॉकअपमध्ये आणखी एक आरोपी तसाच होता. तो पोलिस खात्यातुन बडतर्फ झालेला व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होता. तो पळुन न गेल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. यावरून या पाच जणांना पळुन जाण्यास यानेच सहकार्य केले असल्याचा पोलिसांना संशय आहे.
आरोपींना पकडण्यासाठी अप्पर पोलिस अधिक्षक सागर पाटील यांनी पोलिसांची सात पथके रवाना केली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जेल तोडल्यानंतर अंधारात चालत कुळधरण रस्त्यापर्यंत गेले.
तेथुन ते मोटारसायकलीवरून श्रीगोंद्याच्या दिशेने गेले. हिरडगाव रस्त्यावरून त्यांची फाटाफुट झाली. यातील गंगाधर जगताप हा वेगळ्या दिशेने गेला. तो कर्जत तालुक्यातील महाळंगी येथील आहे. तो करमाळा तालुक्यातील सावली येथे लपुन बसला होता.
याची पोलिसांना माहिती मिळाली. परंतु पोलिस येण्यापुर्वीच तो तेथुन पसार झाला. यावर पोलिसांनी त्याच्या घरावर पाळत ठेवली. तो घरी आला असता त्याच्या मुसक्या आवळल्या. तर मोहन कुंडलिक भोरे व चंद्रकांत महादेव अहमद राऊत या दोघांनाही पकडण्यात आले आहे.
अन्य दोघे आरोपींचा पोलिस कसुन शोध घेत आहेत.
COMMENTS