खुशखबर : बागायतदार शेतकऱ्यांना मिळणार कमी दराने वीज


वेब टीम : मुंबई
बागायतदारांसाठी वीज दर कमी करण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात अशा सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकीत आज मंत्रालयात दिल्या.

डॉ.राऊत म्हणाले, शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर देण्यासंदर्भात उपलब्ध निधीअंतर्गत विविध योजना तयार करून त्याचे वितरण करण्यात यावे. १०० टक्के रक्कम देणारे शेतकरी, ३० टक्के रक्कम देणारे तसेच पूर्ण अनुदान शासन देणार असलेल्या शेतकऱ्यांची वर्गवारी करावी व त्याप्रमाणे तात्काळ स्वरूपात ट्रान्सफॉर्मरचे वितरण करण्यात यावे. याचबरोबर जे शेतकरी थकबाकी अदा करीत आहेत अशांनाही विशेष प्रावधानाने ट्रान्सफॉर्मर वितरित करण्यात यावे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत दिवसा सौर ऊर्जा शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी.

आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी थकबाकीसंदर्भात उपाययोजना कराव्यात. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून घ्यावा. शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले विद्युत रोहित्रे जोडणीनंतर तात्काळ नादुरूस्त होत असल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांनी थकबाकी अदा केल्यास विद्युत रोहित्रे तात्काळ उपलब्ध करून द्यावे. जिल्हास्तरीय समिती तयार करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात यावे. अशा सूचना मंत्री डॉ. राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीस आमदार दिलीप बनकर, नरहरी झिरवळ, हिरामन खोसकर, सुहास कांदे, सरोज अहिरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post