कोरोना विषाणू : राज्यात चार जण निरीक्षणाखाली; २२ जणांना घरी सोडले


वेब टीम : मुंबई
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयात निरीक्षणाखाली सध्या चार प्रवासी दाखल आहेत. त्यातील तीन नागपूर येथे तर एक मुंबईत दाखल आहे. नागपूर येथे दाखल असलेल्या तिघांपैकी एकाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत राज्यात 22 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ हजार ३७६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १२९ प्रवासी आले आहेत.

 दि.१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले २२ प्रवासी आजपर्यंत करोनासाठी निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही, पुणे यांनी दिला आहे.

त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या राज्यात ४ प्रवासी भरती आहेत. यापैकी ३ जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे तर एक जण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे  भरती  आहे. नागपूर येथे भरती असणाऱ्या ३ पैकी एका प्रवाशाचा नमुना निगेटिव्ह आला. इतर अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील.

बाधित भागातून येणा-या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवसांकरता करण्यात येत आहे. राज्यात आलेल्या १२९ प्रवाशांपैकी ५४ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post