चीनची परिस्थिती गंभीर : ४२ हजार जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग


वेब टीम : बीजिंग
चीनमध्ये करोना व्हायरसच्या संसर्गामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत चीनमध्ये सुमारे 42 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍या नागरिकांची संख्या वाढत असून आतापर्यंत 1000 हून अधिक जणांचा बळी गेला आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्यावतीने याबाबत माहिती देण्यात आली. सोमवारी आणखी 108 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, 2478 नवे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, कोरोनामुळे 1016 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 42 हजार 638 जणांना संसर्गाची लागण झाली आहे.

हुबेई प्रांतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सर्वाधिक मृत्यूची नोंद याच प्रातातून झाली आहे. 3996 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

सोमवारी 849 रुग्णांची प्रकृती गंभीर झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 7333 जणांची प्रकृती गंभीर आहे. हॉंगकॉंगमध्ये सोमवारपर्यंत 42 जणांना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली.

एकाचा मृत्यू झाला आहे. तर, मकाऊमध्ये 10 आणि तैवानमध्ये 18 जणांना संसर्ग झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्लूएचओ) आंतरराष्ट्रीय तज्ञांचे एक पथक चीनमध्ये दाखल आहे. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी हे पथक चीनच्या आरोग्य विभागाला मदत करणार आहे.

कोरोना व्हायरस हा वेगवेगळ्या विषाणूंचा समूह आहे. त्यातील सहा विषाणू मानवाच्या प्रकृतीस अपायकारक असल्याचे समोर आले आहे.

कोरोना विषाणूंच्या फैलावाला आळा घालण्यासाठी हे पथक काम करणार आहे. ’नव्याने सापडणार्‍या रुग्णांची संख्या स्थिर होत आहे.

मात्र, त्याविषयी कोणताही अंदाज वर्तविणे खूपच घाईचे ठरेल,’ अशी प्रतिक्रिया ’डब्ल्यूएचओ’ च्या आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख मायकेल रायन यांनी दिली.

चार दिवस सातत्याने रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. आजाराचा फैलाव रोखण्यासाठी 24 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या काळामध्ये असणार्‍या सुट्ट्या 9 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आल्या होत्या.

याशिवाय, अनेक कार्यालयांमधील कर्मचार्‍यांना घरातूनच काम करण्याची सूचनाही करण्यात आली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post