वेब टीम : अहमदनगर बंद घराचे सेफ्टी लॉक व दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. आतील सामानाची उचका-पाचक करुन घरातील रोख रक...
वेब टीम : अहमदनगर
बंद घराचे सेफ्टी लॉक व दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. आतील सामानाची उचका-पाचक करुन घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा 2 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.
ही घटना केडगाव भूषणनगर येथील लिंक रोडवरील कारमेल हायस्कूलजवळ सोमवार (दि.10) घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नवनाथ अनाजी बांबोरे (वय 65) हे त्यांच्या पत्नीसह अकोले येथे गेले होते. त्यांच्या घरात फिशटँक असल्याने त्यांनी त्यांची मुलगी राजश्री हिस (रा.बी.एस. एन.एल. क्वॉटर्स, स्टेट बँक चौक) हिस फोन करुन फिशटँक मधील माश्यांना खाद्य देण्याकरीता सांगितले.
यावरुन तिने रविवारी (दि.9) रोजी सायंकाळी 6 वाजता माश्यांना खाद्य देवून घराला कुलूप लावून निघून गेली व दुसर्या दिवशी सोमवार (दि.10) रोजी माश्यांना खाद्य देण्याकरीता गेली असता तिचा सेफ्टी डोअर तुटलेले व घराच्या दरवाज्याचे कुलूपही तुटलेले दिसून आले.
तिने तिच्या वडलांना फोन करुन या घटनेबाबत माहिती दिली. चोरीची माहिती कळताच बांबुरे पती-पत्नी अकोल्याहून ताबडतोब घरी आले.
त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील 1 लाख 40 हजार रोख रक्कम, 35 ग्रॅम वजनाचे सोन्याची डिस्को व सोन्याचे मणी जुंपलेले सोन्याचे गंठण, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 20 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, 11 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दोन बाजुबंद व सोन्याची नथणी असा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी नवनाथ बांबुरे यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.क. 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून तपास कोतवाली पोलीस हे करीत आहेत.
COMMENTS