माध्यमिक शिक्षक सोसायटीत 'परिवर्तन' नाहीच; पुरोगामी मंडळाची सरशी


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची आर्थिक कामधेनु असणार्‍या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी पुरोगामी सहकार आघाडीने 21 पैकी 17 जागा जिंकत सलग चौथ्यांदा आपला झेंडा फडकवला. तर विरोधी परिवर्तन आघाडीला केवळ चार जागा मिळाल्या. तिसर्‍या आघाडीचे पूर्ण पानिपत झाले. सत्ताधार्‍यांच्या पारदर्शी कारभाराला मतदारांनी पुन्हा कौल देत विरोधकांनी त्यांच्यावर केलेले गैरव्यवहाराचे आरोप नाकारले.

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाच्या 21 जागेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शहरात पार पडली. निवडणुकीसाठी प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी सहकार आघाडी, आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडी तर सुनील पंडीत यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा आघाडी रिंगणात होती. सोसायटीत गेल्या 17 वर्षापासून कचरे यांच्या पुरोगामी आघाडीची सत्ता आहे. यावेळीही त्यांनी 21 पैकी 17 जागा जिंकत सलग चौथ्यांदा बाजी मारली. तर विरोधी आघाडीचे केवळ चार शिक्षक नेते निवडून आले.

कचरे यांनी प्रचारात पारदर्शी, दूरदर्शी कारभाराचा प्रचार करत संस्थेच्या कल्याणकारी निर्णयावर जोर दिला. सभासदांच्या आर्थिक हिताचे गणिते मांडत त्यांनी पुन्हा मतदारांकडे सत्ता मागितली. तर विरोधी परिवर्तन आघाडीने संस्थेतील गैरकारभाराबाबत रान उठवले. तिसर्‍या आघाडीकडे मुद्दे नसल्याने मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले. कचरे यांनी सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान मिळवला. त्यांच्याखालोखाल शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे यांना मते मिळाली, विशेष म्हणजे शिंदे विरोधी आघाडीचे उमेदवार असूनही त्यांना मतदारांनी दोन क्रमांकाची मते दिली. विरोधी आघाडीतील काही उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले.

विजयी उमेदवार – पुरोगामी सर्वसाधारण- प्रा. भाऊसाहेब कचरे (5358), दिलीप काटे (4576), ज्ञानेश्वर काळे (4483), संजय कोळसे (4377), चांगदेव खेमनर (4679), अनिल गायकर (4248), काकासाहेब घुले (4456), अशोक ठुबे (4418), सुर्यकांत डावखर (4387), अण्णासाहेब ढगे (4135), सत्यवान थोरे (4304), धनंजय म्हस्के (4712), सुरेश मिसाळ (4404), कैलास राहणे (4164), महिला आशा कराळे (4785), मनीषा म्हस्के (4583) अनुसूचित धोंडीबा राक्षे (4384)

परिवर्तन सर्वसाधारण आप्पासाहेब शिंदे (5100), बाबासाहेब बोडखे (4200), ओबीसी- महेंद्र हिंगे (4752), भटक्या विमुक्त- वसंत खेडकर (4384).

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post