सख्ख्या मुलानेच वाजविला बापाचा 'गेम'.... खून करून 'बॉडी' टाकली नदीपात्रात....

 


वेब टीम : अहमदनगर

निघोज येथे आढळून आलेल्या मृतदेहाच्या प्रकरणातील खुनाचे रहस्य अखेर उलघडले आहे. मित्रांच्या मदतीने मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून, या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. पारनेर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन आरोपींना अटक केली आहे.


पारनेर तालुक्यातील निघोज येथे कुकडी नदीपात्रात एका पत्र्याच्या कोठीमध्ये 27 ऑगस्ट रोजी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात इसमांनी खून करुन प्रेत पेटीत घालून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कुकडी नदी पात्रात टाकून दिले होते. याबाबत दामू धोंडीबा घोडे (माजी सरपंच, रा. टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पारनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ज्ञ, सायबर तज्ञ पथकातील कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या दिल्या होत्या.


पोलिस पथकांनी घटनास्थळाच्या परिसरात, लगतच्या गावांमध्ये व एमआयडीसी भागात जावून माहिती संकलित केली. तपासादरम्यान 11 सप्टेंबर रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे मयताच्या वर्णनाशी मिळती-जुळती मिसींग दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकातील कर्मचार्‍यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावून माहिती घेतली असता सतिष सदाशिव कोहकडे (वय 49, रा. कारेगांव, ता. शिरुर, जि. पुणे) हे दि. 25 ऑगस्टपासून मिसींग असल्याबाबत नोंद आढळून आली. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना मयताचे कपडे, करदोरा, हातातील दोरा व मिळून आलेल्या वस्तूंचे फोटो दाखविल्यावर नातेवाईकांनी मयत हा मिसींग व्यक्तीच असल्याचे ओळखले. ओळख पटविण्यासाठी मयताचे राखून ठेवलेले शरीराचे घटक तसेच नातेवाईकांच्या डीएनए चाचणी नियोजन करण्यात आले होते.


पोलिसांना धागेदोरो मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून कारेगांव येथील तांत्रिक व गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरुन मयताच्या मृत्यूबाबत त्याच्या मुलाकडे सखोल चौकशी केली. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याने वडील आईला योग्य वागणूक देत नसल्याने व घरभाड्याचे व शेतीचे असलेले सर्व पैसे हे वडील त्यांचे अनैतिक संबध असलेल्या दुसर्‍या महिलेवर खर्च करत असल्याचे सांगत यावरुन त्याचे वडीलांशी नेहमी वाद होत असल्याचे सांगितले. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याचे वडीलांशी वाद झाले. तसेच आईला मारहाण केल्याचा राग मनात धरुन मयताचा मुलगा प्रदीप सतिष कोहकडे (रा. कारेगांव, ता. शिरुर, जि. पुणे) याने त्याचे मित्र हर्षल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे (दोघेही रा. कारेगांव) यांच्यासह इतर दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने मयता घरामध्येच  डोळ्यात मिरचीची पूड टाकून, तोंड दाबून व कापडी पट्टयाने गळा आवळून खून केल्याचे सांगितले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे प्रेत मारुती कारमध्ये टाकून निघोज येथील कुंडावरील पुलावरुन वाहत्या पाण्यात टाकून दिले. त्यानंतर बनाव रचून मयताची कार ही शिरुर तालूक्यातील करडे येथील घाटामध्ये खाली दरीत सोडून दिल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानुसार मुलासह त्याचे मित्र व अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी करीत आहेत. सदरची कामगिरी सपोनि गवळी, सपोनि वाघ, पोसई पदमने, पोसई बोत्रे, पोहेकॉ जाकिर शेख, निकम, पोकॉ दिवटे, चौगुले, खाडे, पाचारणे, शिंदे, राठोड यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post