लालपरीचा प्रवास होणार पूर्ण क्षमतेने...वेब टीम : पुणे

दीर्घ कालावधीनंतर प्रवाशांच्या सेवेत रूजू झालेली एसटी बस 50 टक्के प्रवासी क्षमतेने धावत होती. 


मात्र शुक्रवार पासून एसटी बस पूर्ण आसन क्षमतेने चालवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. 


प्रवासापूर्वी तसेच प्रवासात प्रवाशांनी मास्कचा वापर करणे व हात निर्जंतुक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


20 ऑगस्ट पासून राज्यात एसटीची प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. 


मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एकूण आसन क्षमतेच्या केवळ 50 टक्के क्षमतेने प्रवास करणे बंधनकारक करण्यात आले होते. 


याबाबत एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती. 


त्यानुसार राज्य शासनाने प्रत्येक प्रवासी व कर्मचार्‍यांनी प्रवासादरम्यान मास्क लावणे व निर्जंतुक करणे या अटीवर बसच्या पुर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. 


त्यानुसार शुक्रवार पासून सर्व एसटी बस पुर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करणार आहेत.


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात गेली पाच महिने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यभर एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. 


नंतर राज्य शासनाच्या सुचनेनुसार टप्प्याटप्प्याने एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. 


सद्य:स्थितीत राज्यात दिवसभरात एसटीच्या सुमारे 5 हजार बस धावत आहेत. 


या बसमधून सुमारे 5 ते 6 लाख प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. 


पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाल्यास, भविष्यात कमी बसद्वारे जास्तीत जास्त लोकांची ने-आण करणे शक्य होणार आहे. 


एसटीच्या सर्व बस वारंवार निर्जंतुक करण्यात येणार आहेत. 


त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसच्या प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post