आक्रमक डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन...



वेब टीम : न्यूयॉर्क

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०२१ च्या नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळाले आहे. 


इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारासाठी मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यासाठीच हे नामांकन दिले आहे.


नॉर्वेच्या संसदेतील सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी ट्रम्प यांना नामांकित केले आहे. ख्रिश्चन हे नॉर्वेच्या संसदेमध्ये चौथ्यांदा निवडून आलेले खासदार आहेत. 


त्याचप्रमाणे ते ‘नाटो’साठी काम करणाऱ्या नॉर्वेच्या संसदीय समितीचे अध्यक्षही आहेत. 


युएई आणि इस्रायलमधील संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली असे ख्रिश्चन यांनी नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाचे समर्थन करताना सांगितले.


“माझ्या मते इतर कोणत्याही शांतता नोबेल पुरस्कार विजेत्यांपेक्षा ट्रम्प यांनी देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अधिक काम केले आहे,” असे ख्रिश्चन यांनी खासगी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 


तसेच मध्य आशियामधून अमेरिकन सैन्याला परत बोलवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचेही ख्रिश्चन यांनी कौतुक केले.


“अपेक्षेप्रमाणे मध्य आशियामधील बऱ्याच देशांनी युएईप्रमाणेच शांततेचा मार्ग निवडतील. इस्रायल आणि युएईमध्ये झालेला करार हा गेम चेंजर ठरु शकतो. 


या करारामुळे मध्य आशियातील देशांमध्ये सहकार्य आणि भरभराटीला संधी उपलब्ध होतील,” असं ख्रिश्चन यांनी ट्रम्प यांच्या नामांकनाची शिफारस करणाऱ्या पत्रामध्ये लिहिले आहे.


ऑगस्ट महिन्यामध्ये युएई आणि इस्रायलमध्ये ऐतिहासिक करार झाला. 


या करारानुसार आधीचे सर्व वाद विसरुन दोन्ही देशांनी नव्याने सुरुवात करण्याची आणि एकमेकांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून परस्पर सहकार्यासंदर्भातील करारांवर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांना स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 


ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याने या दोन्ही देशांमधील वाद मिटल्याचे सांगितले जाते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post