योगीजी विसरू नका... निर्भया प्रकरणानं दिल्लीच तख्त उलटलं होत...

 


वेब टीम : नाशिक

निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं. 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विसरू नये, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. 


हाथरसची घटना मन विषण्ण करणारी आहे, असं भुजबळ म्हणाले.


काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेली वागणूक निषेधार्ह असल्याचं देखील भुजबळ म्हणाले. 


राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न पडला आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.उद्या 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती आणि गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींना धक्काबुक्की तसंच त्यांच्यावर लाठीचार्ज होणं हे निंदनीय आहे. 


देशाच्या संसदेतील एका वरिष्ठ नेत्याला अशा प्रकारची वागणूक दिली जातीये, तिथे सर्वसामान्य नागरिकांची काय हालत असेल, असं भुजबळ म्हणाले.


तत्पूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेले असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. 


मग राहुल आणि प्रियांका गांधी यांनी पायी रस्ता कापण्याचं ठरवलं दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. 


मात्र पोलिसांच्या धक्काबुक्कीनंतर आणि राहुल गांधी यांच्या कॉलरला पकडून पोलिसांनी असभ्य वर्तन केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post