महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घटना पायदळी तुडविण्याचे काम केले...वेब टीम : अहमदनगर

राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे. परंतु महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घटना पायदळी तूडवण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्र्यांना मंदिर सुरू करण्याबाबत त्यांचे पत्र म्हणजे त्यांनी अधिकाराचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी मागणी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. मंदिर उघडण्याच्या विषयावरून भारतीय जनता पक्ष राजकारण करत असून केवळ भावना भडकावण्याचा उद्देश त्यामागे आहे. शाळा-महाविद्यालय सुरू करावे म्हणून ते बोलत नाही. तर मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून द्वेष पूर्ण राजकारण ते करीत आहेत, अशी टीकाही खोतकर यांनी केली


शिवसेनेचे उपनेते स्व. अनिलभय्या राठोड यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नगर येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक विक्रम राठोड, संजय शेंडगे, संभाजी कदम, नगरसेवक भाऊ बोरुडे, मदन आढाव आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


खोतकर म्हणाले की, मी 35 वर्षापासून विधिमंडळ कामकाजात आहे. परंतु माझ्या आठवणीत राज्यपालांनी अशाप्रकारे भूमिका घेतल्याचे आठवत नाही. त्यामुळे सध्याचे राज्यपालांना भारतीय संविधान मान्य नाही का, असे वाटते. राज्यपालपदाच्या खुर्चीवर बसून जातिवाद करणे चुकीचे आहे. त्यामुळे या पदावर राहणे त्यांना संयुक्तिक नाही, असे सांगून ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थपणे राज्याचा कारभार करीत आहेत. करोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी त्यांनी काळजी घेतली आहे. मंदिरे उघडण्याबाबत जालना येथेच आम्ही सुरुवातीला मागणी केली होती. परंतु रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून मंदिरांतून गर्दी होऊ नये म्हणून तो निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री गांभीर्याने याकडे पाहत आहेत. परंतु भाजप यात द्वेषपूर्ण राजकारण करीत आहेत. त्यात आता राज्यपालपद हे घटनादत्त पदही संविधान पायदळी तुडवण्याचे काम करीत आहे, अशी टीका खोतकर यांनी केली. 


एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेश याबाबत बोलताना खोतकर यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भले-बुरे कळते, त्यामुळे योग्य तो निर्णय त्यांनी घ्यावा, असे खोतकर म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post