वेब टीम : चिलिका ओडिशा राज्यातील चिलिका येथील आमदार प्रशांत जगदेव यांच्या कारने चक्क २२ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात ...
वेब टीम : चिलिका
ओडिशा राज्यातील चिलिका येथील आमदार प्रशांत जगदेव यांच्या कारने चक्क २२ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात ओडिशामधील खुर्दा जिल्ह्यात शनिवारी दुपारी घडला असून यामध्ये ७ पोलिसांसह २२ जण जखमी झाली आहेत.
यामधील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय. कारने लोकांना चेंगरल्यामुळे संतप्त जमावाने आमदाराला मारहाण केली आहे. या मारहाणीत आमदार चांगलाच जखमी झाला असून त्याच्यावर तसेच जखमी माणसांवर उपचार सुरु आहेत.
खुरदा जिल्ह्यातील बाणापूर येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे काही समर्थक कार्यालयाच्या बाहेर जमले होते. यावेळी चिलिका येथील आमदार प्रशांत जगदेव यांची कार जमलेल्या लोकांच्या अंगावर भरधाव वेगात आली. काही समजण्याच्या आत या कारने तब्बल २२ जणांना चिरडले.
त्यानंतर संतप्त जमावाने आमदार जगदेव यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली. प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवले. सध्या जखमी लोकांना तसेच आमदार जगदेव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती एसपी आलेखचंद्र पाधी यांनी दिली.
प्रशांत जगदेव यांची बिजू जनता दलातून मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हकालपट्टी करण्यात आली होती. त्याचबोरबर जगदेव यांना जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदावरूनदेखील हटवण्यात आले होते. मात्र या घटनेनंतर ओडिशा राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज हरिशचंद्र यांनी आमदार जगदेव यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली आहे.
COMMENTS