सुपा परिसरातील वीज पुरवठा तातडीने सुरळीत करा भाजप नेते सागर मैड यांची मागणी पारनेर/प्रतिनिधी : चालू वर्षी तापमानाने ४२ अंश सेल्सियस चा टप्पा...
सुपा परिसरातील वीज पुरवठा तातडीने सुरळीत करा
भाजप नेते सागर मैड यांची मागणी
पारनेर/प्रतिनिधी :
चालू वर्षी तापमानाने ४२ अंश सेल्सियस चा टप्पा पार केला असून ऐन उन्हाळ्यात सुपा शहरात अचानक होणाऱ्या भारनियमनामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रात्री-अपरात्री जाणाऱ्या या विजेच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले असून विद्यूत पुरवठ्याच्या वेळेत बदल करत तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे तालुका - सरचिटणीस तथा उपसरपंच सागर मैड यांनी केली आहे.
मैड यांनी सुपा येथील कनिष्ठ अभियंता श्रेयस रुद्राकर यांची भेट घेऊन विजेच्या मागणीचे निवेदन दिले. चालू वर्षी तीव्र उष्णता जाणवत असून दिवसा व रात्री अपरात्री महावितरणकडून मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात असून सध्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे. सुपा शहरालगत औद्योगिक वसाहत असल्याने रात्री उशिरा कामगार घरी परतल्यानंतर विद्युत पुरवठा खंडित झालेला असतो.
रात्री-अपरात्री बारा एक वाजता वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरात चोरीचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून महावितरण कडून विद्युत पुरवठा च्या वेळेत बदल करावा, अशी मागणी मैड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
COMMENTS